Your Own Digital Platform

महामंडळांच्या नियुक्‍त्यांमध्ये भाजपचे राजकीय पाऊल पुढे


सातारा : सातारा गटबाजीमुळे सातत्याने निर्माण होणाऱ्या पेचात गुंतलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस, जिल्हा नेतृत्वाअभावी कॉंग्रेसमध्ये आलेली मरगळ, पालकमंत्रिपद असूनही “व्हिजन’ नसलेली शिवसेना अशी स्थिती असताना स्वतःची कोणतीच ताकद नसलेल्या भारतीय जनता पक्षाने मात्र जिल्हा पोखरून काढत शांतपणे डावपेच करीत आपली रणनीती स्पष्ट केली आहे. त्याच रणनीतीच्या अंर्तगत महामंडळाच्या निवडी जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी सातारा जिल्ह्याला पुन्हा ताकत देण्याचा प्रयत्न केला. नितीन बानुगडे पाटील यांना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद देऊन भाजपने सेनेला चुचकारले. तर अण्णासाहेब पाटील महामंडळाची धुरा खांद्यावर देउन आमदार व माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्यासाठी पक्षप्रवेशाचा रेड कार पेट घातल्याची चर्चा आहे.

जिल्ह्यातील आठपैकी सात मतदार संघांतील उमेदवार भाजपने जवळजवळ निश्‍चित केले असून साम, दाम, दंड, भेद साऱ्या नीतींचा अवलंब करीत आगामी निवडणुकीची व्यूहरचना गतिमान केली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यात किमान दीडशे बूथ बांधणीचे लक्ष्य आहे. सातारा व माढा या दोन लोकसभा मतदारसंघात भाजपने झेंडा लावण्याचा इरादा पक्का केला आहे. सेनेचे नितिन बानुगडे यांनी संभाजी ब्रिगेडपासून फारकत घेत उपनेते तसेच सांगली सातारा संपर्क प्रमुख पदापर्यंत झेप घेतली. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बानुगडे यांच्या वक्तृत्वाचे फड राज्यभर गाजले. मात्र सातारा जिल्हा शिवसेनेला फारसा फायदा झाला नाही.

गटातटाचे राजकारण हर्षल कदमांचे पाटण प्रेम आणि पालकमंत्री विजय बापू शिवतारे यांची सवडीनुसार होणारी सातारा स्वारी यामुळे शिवसेनेने बाळसे पकडलेच नाही. साताऱ्यात तर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना बिनविरोध खासदार करा या वक्तव्याने निष्ठावंत शिवसैनिकांना घायाळ केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बानुगडे यांना प्रमोशन देऊन सेनेवर राजकीय पावशेर ठेवल्याची चर्चा आहे. आमदार नरेंद्र पाटील यांना त्यांच्या वडिलांच्या नावाने चालणाऱ्या महामंडळावर वर्णी लावून राष्ट्रवादीलाही चेकमेट केल्याची खसखस आहे. राष्ट्रवादीच्या तंबूत पाटलांची होणारी घालमेल हेरत देवेंद्र पतांनी थेट पक्षप्रवेशाची गुगली टाकली मात्र त्याआधीच महामंडळाचे गिफ्ट दिल्याने भाजप ने एक पाऊल पुढे टाकल्याची राजकीय धुरिणांची मते आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्ह्यात कागदावर प्राबल्य आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि पक्षाच्या आमदारांमध्ये असलेल्या सख्ख्यामुळे पक्षापुढे अनेक प्रश्नचिन्हे आहेत. लोकसभा आणि विधानसभा उमेदवारीचा मेळ कसा घालायचा, याच्याच विवंचनेत जिल्ह्यातील नेते गुंतून पडले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव मोठे असले तरी जिल्ह्यातील कॉंग्रेसचे संघटन विस्कळितच नव्हे तर दुबळे झाले आहे. पालकमंत्री विजय शिवतारे आणि शिवसेनेतील काही गटांचे मतभेद जगजाहीर आहेत. श्री. शिवतारे यांना जिल्ह्यात यायला सवडही मिळत नाही आणि ते पक्षबांधणीकडे लक्षही देत नाहीत.

या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांनी मात्र शिस्तबद्धपणे संघटन आणि निवडणुकीची व्यूहरचना गतिमान केली आहे.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर आदी प्रमुखांनी सातत्याने संपर्क ठेवत जुळणी सुरू ठेवली आहे. या पक्षातही गटबाजी आहेच. मूळ कार्यकर्ते आणि पक्षाबाहेरून येऊन तिखट होणारे असा छुपा वाद या पक्षातही आहे. दोन्ही कॉंग्रेसच्या बलाढ्य नेत्यांसमोर मूळ कार्यकर्ते टिकू शकत नसल्याने इतर पक्षांतून येणाऱ्यांवरच पक्षाची भिस्त आहे. सातारा, कऱ्हाड (दक्षिण) व (उत्तर), माण, कोरेगाव, वाई व पाटण या मतदारसंघांतील उमेदवार जवळजवळ निश्‍चित करून त्या त्या मतदारसंघात भक्कम मोर्चेबांधणी पक्ष करीत आहे. दोन्ही कॉंग्रेसचे नेते कोणते डावपेच खेळतील, त्यावर गणिते अवलंबून असली तरी त्यांचीच ताकद घेऊन भाजप आघाडी घेण्याची तयारी करीत आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या जाहीर दौऱ्यांपेक्षा गोपनीय पद्धतीने होणारे दोरे वाढले आहेत. अनेक ठिकाणी नेता-कार्यकर्ता आपल्याकडे वळविण्यासाठी सामोपचाराचे प्रयत्न सुरू आहेत सांगली व सातारा जिल्हयामध्ये चंद्रकांत दादा सध्या तरी बाहुबली ठरले आहेत. बेरजेच्या राजकारणात थेट विद्यमान खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न होण्याची शक्‍यता आहे. मात्र सातारा लोकसभा व विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीवर मिश्‍किल हास्य करणाऱ्या दादांनी प्रचंड सस्पेन्स ठेवला आहे. महामंडळाच्या निवडीमध्येही साताऱ्यात राजकीय समीकरणाचे सुलभीकरण होऊन भाजपचे बस्तान कसे बसेल याचीच काळजी घेण्यात आली आहे.