Your Own Digital Platform

अजिंक्‍यतारा कामगारांची सामाजिक बांधिलकी


सातारा : स्व. भाऊसाहेब महाराजांच्या आदर्श विचारसरणीचा अवलंब करत अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने नियोजनबध्द आणि पारदर्शक कारभार करुन कारखान्याला उर्जितावस्था प्राप्त करुन दिली आहे. यामध्ये कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. आज केरळ येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारखान्यातील सर्व कामगारांनी एक दिवसाचा पगार मदत म्हणून दिला असून कामारांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवोद्गार कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.

कारखान्याच्या कामगार पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत पार पडली. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, संचालक नितीन पाटील, कार्यकरी संचालक संजीव देसाई, पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब थोरात आदी मान्यवरांची प्रमख उपस्थिती होती.

पतसंस्थेच्या सभेपुढील विषयपत्रिकेचे वाचन संचालक संभाजी पाटील यांनी केले. तसेच कामगार गणेशोत्सव मंडळाचे सचिव रामचंद्र जाधव यांनी कामगार फंडाचे वाचन केले. कार्यकारी संचालक देसाई यांनी दोन्ही संस्थांच्या आर्थिक ताळेबंद, नफा- तोटा पत्रक व ताळेबंदावरचे विवेचन कर्मचारी, अधिकाऱ्यांच्यासमोर मांडून पतसंस्था कामगार सभासदांना 13 टक्‍के डिव्हिडंट देत असल्याचे जाहिर केले. तसेच गणेशोत्सव मंडळाच्या कामकाजाची रुपरेषा मांडली.

 कामगार युनियनचे अध्यक्ष कृष्णात धनवे यांनी केरळ पूरग्रस्तींच्या मदतीसाठी कामगारांचा एक दिवसाचा पगार देण्याबाबतचा ठराव मांडला. त्यास सर्व कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला. तसेच कारखान्याचे चाललेले कामकाज आणि त्यामध्ये अधिकारी, कर्मचारी, कामगारांचा असणारा सहभाग आणि कामकाजाबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी समाधान व्यक्‍त केले.