भाजपचे उच्चाटन करा, अन्यथा देशात हुकूमशाही
कोरेगाव :भाजपरुपी कॅन्सरचे उच्चाटन आत्ताच केले नाही तर पुढील पाच वर्षांत निवडणूक बंद होवून देशात हुकूमशाही येईल. विरोधात बोलणार्‍यावर खोटे गुन्हे दाखल करायचे काम सुरु आहे. यांच्या पापाचा घडा भरला आहे. आज दहिहंडीच्या मुहूर्तावर भरलेला घडा फोडण्याचे काम तुम्हाआम्हाला करावे लागणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी केले.

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सोमवारी रहिमतपूर येथे आली होती. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, आ. बाळासाहेब थोरात, आ. हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. तांबे, संपतराव माने, किरण बर्गे, धैयर्शील कदम, भीमराव पाटील, संपतराव माने, अमर काळे, अमीर शेख, निवास थोरात, विलास शिंदे, आदी उपस्थित होते.

अशोक चव्हाण म्हणाले, माझी रहिमतपूरला ही दुसरी भेट आहे. पहिल्या सभेत काँग्रेसला साथ द्या या दिलेल्या आवाहनाला आपण साथ दिल्यानेच या नगरपालिकेत चार सदस्य जनकल्याणाचे काम करीत आहेत. हा मतदार संघातील नेतृत्व जरी राष्ट्रवादीकडे असले तरी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम मला पक्षाध्यक्ष म्हणून घ्यावे लागणार आहे. रहिमतपूर विभागाच्या सर्वांगीण विकासाला आम्ही बांधील आहोत. आपण काँग्रेसच्या धैर्यशील कदमांना साथ द्या. सर्वसामान्य जनतेचा विकास फक्त काँग्रेस पक्षच करू शकतो.

भाजप सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडताना ते म्हणाले, दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि जनतेत दारिद्य्र दिसून येत आहे. सनातन संस्थेला पाठीशी घालून लेखक, पत्रकार, विचारवंत यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे महापाप हे सरकार करत आहे. सामान्य माणसाच्या हक्काकरता राष्ट्रीय काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरु आहे. आज या भरपावसातही एवढ्या मोठ्या संखेने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यानी काँग्रेसची ध्येय धोरणे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवली तर सत्ता बदल झाल्याशिवाय राहणार नाही.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लोकशाही आणि संविधान वाचवायचे असेल तर भाजपचे सरकार गेलेच पाहिजे. नोटबंदी हा भाजप सरकारचा सर्वात मुर्खपणाचा निर्णय होता. नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आलाच नाही. परंतु अस्तित्वात असणारे उद्योगधंदे बंद पडले, मिळणारा रोजगारही गेला. चुकीच्या धोरणामुळे देशातील अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. तिप्पट किंमत देवून राफेल विमान खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा या सरकारने केला आहे. घोटाळेबाज सरकार व त्यांच्या नातेवाईकांसह अधिकारी पदाधिकारी यांनी समृद्धी महामार्गच्या शेजारी जमिनी कशा बळकावल्यात याची माहिती सूज्ञ नागरिकांनी जाणून घेतली पाहिजे. देश वाचवायचा असेल तर देशात आणि राज्यात काँग्रेसचेच सरकार पुन्हा आले पाहिजे. यासाठी काँग्रेस पक्षाने जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे. प्रास्तविक निलेश माने यांनी केले. आभार निलेश पवार यांनी मानले.

No comments

Powered by Blogger.