Your Own Digital Platform

सुरेंद्र गुदगेंमुळेच बेलेवाडीत ३४ लाखांचा बंधारा


मायणी : गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत बेलेवाडीतील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्याकडे शेतीचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी बंधाऱ्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार जिल्हा नियोजन मंडळातून सुमारे ३४ लाख रुपये उपलब्ध करून निधी दिला. त्यामुळे बेलेवाडीतील शेतकरी समाधानी असल्याचे प्रतिपादन रफिक मुलाणी यांनी केले. सदर वेळी हनुमान पतसंस्थेचे चेअरमन संजीव साळुंखे, शाकीर मुलाणी, प्रकाश माळी, नामदेव माळी, जावेद कुमठेकर आदी उपस्थित होते.

यावेळी मुलाणी म्हणाले, दुष्काळी खटावपूर्व भागात शेतीच्या पाण्यासाठी कोणतीच शाश्वत पाणी योजना नाही. येथील जनतेला उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तर शेतकऱ्यांना द्राक्षबागांसाठी पाणी विकत घ्यावे लागते. त्यासाठी पाण्याचा थेंबनाथेंब अडवून तो मातीत जिरवणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी गत जिल्हा परिषद निवडणुकीत बेलेवाडीतील प्रमुख कार्यकर्त्यांनी सुरेंद्र गुदगे यांच्याकडे बंधाऱ्याची मागणी केली होती. त्या मागणीचा गुदगेंकडे शाहिस्तेखान मुलाणी, राजू जुगदर , अनिल दबडे यांनी पाठपुरावा केला. 

 त्यामुळे आतकरीमळा ओढा व कलेढोण ओढा यांच्या संगमावर सुमारे ३३ लाख ७९ हजार रुपयेे खर्चाच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे बेलेवाडीकर ग्रामस्थ नेहमी सुरेंद्र गुदगे यांच्या पाठीशी ठाम उभे राहतील. दिलेल्या शब्दाला जागणाऱ्या नेत्यामुळेच या भागातील पाणीप्रश्न मिटण्यास मदत होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी महीबूब मुलाणी, विलास नायकुडे, असीफ मुलाणी, नतीब घाडगे व ग्रामस्थ उपस्थित होते.