‘बैलंही गेली... अन् नांगरही गेला...’


सातारा : कृषी प्रधान देश म्हणून ओळख असलेल्या भारतात शेतीला महत्व आहे. मात्र, बेभरवशाच्या पावसामुळे बळीराजाने गुडघे टेकल्याचे दिसत आहे. दुष्काळी परिस्थितीने बेजार झालेल्या शेतकर्‍याला बदलत्या परिस्थितीत घडामोडींचाही फटका बसत आहे. पारंपरिक औजारे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

 सर्जा-राजाच्या खिलारी जोडीचे अस्तित्व धोक्यात असताना त्यांच्या जोडीला असणारा नांगरही आता कालबाह्य झाला आहे.भल्या पहाटे डोक्यावर पारंपारिक नांगर, खांद्यावर घोंगडी, पुढे सर्जा - राजाची जोडी हाकत शेताच्या दिशेने पावले टाकणारा बळीराजा शेतात उभा राहून आधुनिक यंत्राद्वारे होणारी नांगरणी पहात असल्याचे चित्र दिसत आहे.

त्यामुळे शेतामध्ये नांगरणीसाठी राबराब राबणारी सर्जा-राजाची जोडी हाकताना शेतकर्‍यांच्या मुखातून घुमणारा आवाज दमला असून अत्याधुनिक यंत्राचा आवाज शिवारात घुमत आहे. ग्रामीण व खेड्यापाड्यातील सर्रास शेतकर्‍यांनी शेतीसाठी आधुनिक साधनांचा वापर करण्यास सुरुवात केल्याने नांगर फाळ, कुळव आदि पारंपारिक साधने दिसेनाशी होवू लागली आहेत.

बळीराजाने बैलजोड्यांकडे पाठ फिरवल्याने शेतीसाठी वापरला जाणारा नांगरही दुर्मिळ होत चालला आहे. शेतात नांगर ओढणार्‍या सर्जा - राजाच्या जोडीऐवजी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे.

सर्वसामान्य शेतकर्‍यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असून यांत्रिकीकरणाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येवू लागला आहे. शेतीच्या मशागतीसाठी व श्रमाच्या कामासाठी मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलरसारख्या उपकरणाचा उपयोग करण्यात येत आहे.

No comments

Powered by Blogger.