Your Own Digital Platform

पाणी फाऊंडेशन जोमात, जलयुक्त शिवार कोमात


बिदाल : “जलयुक्त शिवार अभियान” सध्या ढेपाळलेल्या स्थितीत आहे. लाल फितीच्या कारभारामुळे जलयुक्त शिवारचा झंझावात कमी झाल्याचे दिसत आहे. दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणेचाच वापर करून आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेली वॉटर कप स्पर्धा मात्र गावागावांमध्ये लोकप्रिय होत चालली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच वर्षी जलयुक्त शिवार अभियान धडाक्‍यात सुरू करण्यात आले होते. दरवर्षी साधारण पाच हजार गावे निवडली जातात. पहिल्या वर्षांत या योजनेला लोकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. गावांतील जनता, सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्या अशा सगळ्या घटकांचा जलयुक्तमध्ये सहभाग होता. दुसऱ्या वर्षीही ही योजना उत्मम प्रकारे चालली. पण त्यानंतर मात्र जलयुक्तचा झंझावात मावळल्याचे दिसत आहे.

जलयुक्त शिवार अभियान ढेपाळलेले असताना आमिर खानच्या वॉटर कपला मात्र जोरात प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, वॉटर कप स्पर्धेसाठी सरकारी यंत्रणेने सहकार्य करावे, अशा खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच सुचना आहेत. त्यामुळे तलाठी, ग्रामसेवक, तहसिलदार, प्रांत, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा परिषदांचे सीईओ, जिल्हाधिकारी असे सगळे महत्वाचे अधिकारी वॉटर कप स्पर्धेअंतर्गत गावागावांत जलसंधारणाची कामे राबविण्यासाठी कष्ट घेत आहेत. पण हेच अधिकारी जलयुक्त शिवार अभियानासाठी राबत नसल्याचे दिसत आहे.