Your Own Digital Platform

स्वप्न साकार झाल्याचा सर्वोच्च आनंद


कराड : मला या स्पर्धेतून खूप काही शिकायला मिळालं. तुमच्या आयुष्याला शिस्त असणे, वेळेच महत्व किती आहे याची खूप चांगली शिकवण मला या स्पर्धेतून घेता आली. तर आपले स्वप्न साकार झाल्याचा आनंद काय असतो हे मी अनुभवले. संधी मिळण्यासाठी वयाचे बंधन नसते. संधी आपण घ्यायची असते आणि तिचे सोने करायचे असते, हे उद‍्गार आहेत ‘डान्स दिवाने’ शो मध्ये पहिल्या टॉप 5 पर्यंत पोहोचणार्‍या मिनल ढापरे व ‘मिस कॉन्जिनॅलिटी’हा किताब पटकावणारी आल्फिया मुल्‍ला यांचे.

येथील वेणूताई चव्हाण सभागृहामध्ये दै. ‘पुढारी’कस्तुरी क्लबच्या कार्यक्रमामध्ये दै. पुढारीच्यावतीने सत्कार झाल्यानंतर कोरिओग्राफर मिनल ढापरे व आल्फिया मुल्‍ला या कराडच्या सुवर्णकन्यांनी आपले अनुभव व्यक्‍त केले.

मिनल ढापरे म्हणाल्या, आपल्या आवडत्या अभिनेत्री, अभिनेत्यांबरोबर एखादा फोटो तरी काढायला मिळावा यासाठी प्रत्येक सिनेमाप्रेमी धडपडत असतो. मात्र त्यांच्याबरोबर आपल्याला काम करायला मिळाले, त्यांचा सहवास मिळाला हा आनंद अवर्णनीय असतो. वयाच्या चाळीसाव्या नंतर आता आपण काही करू शकत नाही अशी इतर महिलांसारखीच माझीही मानसिकता झाली होती. मात्र कलर्स टिव्हीच्या ‘डान्स दिवाने’ या शोमध्ये पहिल्या 5 मध्ये स्कोअर केला. मात्र वोटिंग कमी पडल्याने मला बाहेर पडावे लागले. कराडकरांची माझ्यासाठीची सकारात्मकता मला टॉप स्कोअरपर्यंत पोहोचवू शकली. माझी गुरू असणारी अभिनेत्री माधुरी दिक्षीत

हिच्याबरोबर मला काम करायला मिळाले हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. कार्यक्रमांदरम्यान मला प्रत्येक गोष्टीचा फायदा होत गेला. यावेळी विविध सेलिब्रेटीजना भेटता आले. माधुरी दिक्षीतवर केलेली कविता तिला भेट दिली. माझ्या घागर्‍यावर तिची व सलमान खानची स्वाक्षरी घेतली. तिच्या दोन गाण्यांवर तिच्यासमोर परफॉर्मन्स दिला. आतापर्यंत स्टेज शो शंभरच्यावर झाले आहेत. टिव्हीवर एकूण 4 शोज झाले. 21 वर्षापासून विजय दिवस समारोहमध्ये ग्रुपसमवेत सहभाग आहे. हे यश मिळवत असतानाच ‘डान्स दिवाने’ मध्ये मिळालेली संधी माझ्या आजवरच्या मेहनतीची पावती आहे.

खंडाळा येथे झालेल्या वर्ल्ड सुपर मॉडेल इंडिया साऊथ आशिया या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सौदर्य स्पर्धेत ग्रामीण भागातील रेठरे येथील आल्फिया मुल्‍ला हिने ‘सर्वगुणसंपन्न’ हा किताब पटकावला. आल्फिया ही कॅन्सर रूग्णांसाठी निधी संकलन करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करते. या निधीतून ती आर्थिक दृष्ट्या गरीब असणार्‍या रूग्णांना मदत करते. मेडिकल कॉलेजची विद्यार्थीनी असलेल्या आल्फिया हिने सांगितले की, माझे आईवडिल, माझे सर्व कुटुंबिय, शिक्षक यांचा माझ्या यशात फार मोठा वाटा आहे.वेळ आणि शिस्त या गोष्टी पाळल्या की आयुष्यात यश मिळते हे मी अनुभवले असल्याचे आल्फिया हिने सांगितले.