Your Own Digital Platform

आता नवरात्रोत्सवाचे वेध


सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाची धामधूम संपली असून आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. दुर्गामातेच्या विविध रूपातील मूर्ती बनविण्याची लगबग सातारा शहर व परिसरातील कुंभारवाड्यांमध्ये शिगेला पोहोचली असून सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून या उत्सवाची तयारी सुरू झाली आहे.आदिशक्तीचा जागर असलेल्या नवरात्र उत्सवास बुधवार दि. 10 आक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. आता या उत्सवाला अवघे बारा दिवस उरले आहेत. 

सातारा शहरासह जिल्ह्यात दुर्गामातेच्या विविध रुपातील मूर्ती बनवण्याच्या कामास वेग आला आहे. सातारा शहरातील गडकर आळी, बुधवार नाका व अन्य ठिकाणी मुर्तीकारांनी 3 फुटापासून 15 फुटापर्यंत मूर्ती बनवण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेतलेआहे. देवीचा मुखवटा उठावदार आणि आकर्षक करण्याबरोबरच डोळ्यांमध्ये तेज साठवणे हे मूर्तीकारांचे कसब असते. मूर्ती बनवणे व त्यामूर्तीमध्ये सजीवता आणणे हे अतिशय कुशलतेचे काम असल्यामुळे दुर्गामातेच्या मूर्ती बनवताना जास्त वेळ लागतो.

 त्यातच प्रशासनाने पर्यावरणपूरक मुर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे नवरात्रोत्सव मंडळांना आवाहन केले असल्याने मूर्तीकार शाडू मार्तीच्या मूर्ती करताना दिसत आहेत. मूर्तीकारांना मूर्ती तयार करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे मूर्तीकारांच्या कामालाही वेग आला आहे.

दिवसेंदिवस सातारा शहरासह जिल्ह्यात नवरात्र उत्सव साजरा करणार्‍या मंडळांची संख्याही वाढू लागली आहे. हल्ली सण उत्सवांना इव्हेंटचे स्वरुप प्राप्त झाले असल्याने साजरीकरणाऐवजी सादरीकरणाला महत्व येवू लागले आहे. त्यामुळे नवरात्र उत्सव मंडळांमध्येही उत्सवकाळात वेगवेगळ्या देखाव्यांवर भर दिला जावू लागला आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रम, स्पर्धांचेही आयोजन केले जात असल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांचे त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे.