Your Own Digital Platform

जिल्ह्यात ४६२ उमेदवारांचे नशीब मतदान यंत्रांत बंद; आज निकाल


सातारा : जिल्ह्यातील 32 ग्रामपंचायतींसाठी बुधवारी चुरशीने झालेल्या मतदानात सरपंचपदाच्या 78, तर सदस्यपदाच्या 384 अशा 462 उमेदवारांचे नशीब मतदान यंत्रांत बंद झाले. एकूण ग्रामपंचायतींच्या 37 हजार 127 मतदारांपैकी 30 हजार 677 मतदारांनी मतदानात सक्रिय सहभाग घेतला. जिल्ह्यातील आठ तालुक्यांतून संबंधित ग्रामपंयातींसाठी 107 मतदान केेंद्रांवर 82.83 टक्के मतदान झाले.

झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवारी (दि. 27)सकाळपासून होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत 12 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 दरम्यान मुदत संपणार्‍या व नव्याने अस्तित्वात आलेल्या 48 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. परस्पAरांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने 12 ग्रामपंचायती पूर्वीच बिनविरोध झाल्या. 3 ग्रामपंचायतींच्या 3 रिक्त सरपंचदांसाठी पोटनिवडणुकीत एकही अर्ज दाखल न झाल्याने ही पदे पुन्हा रिक्त राहिली. त्यामुळे उर्वरित 32 ग्रामपंचायतींसाठी बुधवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत 107 मतदान केंद्रांवर चुरशीने मतदान झाले. काही ठिकाणी शाब्दिक खटकेही उडाले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

कराड तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या 37 मतदान केंद्रांवर 11 हजार 206 पैकी 10 हजार 88 मतदारांनी मतदान केले. या तालुक्यात 90.02 टक्के मतदान झाले. पाटण तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींच्या 15 मतदान केंद्रांवर 4 हजार 84 पैकी 2 हजार 888 मतदारांनी हक्क बजावला. त्याठिकाणी 70.71 टक्के मतदान झाले.वाई तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींच्या 23 मतदान केंद्रावर 11 हजार 545 पैकी 9 हजार 318 मतदारांनी मतदान केले. याठिकाणी 80. 71 टक्के मतदान केले. महाबळेश्‍वर तालुक्यातील 1 ग्रामपंचायतीच्या 3 मतदान केंद्रांवर 90.96 टक्के मतदान झाले.

कोरेगाव तालुक्यातील एका ग्रामपंचायतींच्या 3 मतदान केंद्रांवर 293 पैकी 269 मतदारांनी मतदान केले. याठिकाणी 91.81 टक्के मतदान झाले. खटाव तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींच्या 26 मतदान केंद्रावर 9 हजार 623 पैकी 7 हजार 772 मतदारांनी हक्क बजावला. याठिकाणी 80.76 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील 32 ग्रामपंचायतींसाठी 18 हजार 166 पैकी 15 हजार 174 स्त्री मतदारांनी मतदान केले. तर 18 हजार 961 पैकी 15 हजार 503 पुरुष मतदारांनी मतदान केले.

एकूण 37 हजार 127 मतदारांपैकी एकूण 30 हजार 677 मतदारांनी मतदानात सक्रिय सहभाग नोंदवला. जिल्ह्यात संबंधित ग्रामपंचायतींसाठी 82. 63 टक्के मतदानाची नोंद झाली. दरम्यान, संबंधित तहसीलदारांनी निश्‍चित केलेल्या ठिकाणी संबंधित ग्रामपंचायतीची मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणार आहे. ग्रामपंचायती तसेच मतदान केंद्रांची संख्या कमी असल्यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे.