श्रीकृष्ण जन्माष्टमी: साताऱ्यात मुरलीधर मंदिरात जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन


सातारा :  श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सातारा येथील यादोगोपाळ पेठेतील दिवशीकर बंधु यांचे श्री मुरलीधर मंदिरात विशेष जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त 3 दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमात शनिवार दि. 1 सप्टेंबरला जन्माष्टमी निमित्त मंदिरात गोविंदशास्त्री जोशी यांच्या श्री वेदांत विद्यापीठातील 15 ब्रह्मवृदांचा मंत्रजागर व वेद पठण, सायंकाळी श्रीरामकृष्ण आश्रम येथील भक्तांचे शाम नाम संकिर्तन तसेच भजन गान संपन्न झाले. तसेच पानसुपारीचा कार्यक्रम संपन्न झाला.

मंदिरात कृष्ण मूर्तीचे मागे नव्याने बनवलेली चांदीची प्रभावळ व गजांत लक्ष्मीचे नक्षीकाम असलेले चित्र विशेष आकर्षण ठरत आहे. आज रविवार दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वा. श्रीमुरलीधराची विशेष षोडशोपचार पुजा व पवमान पंचसुक्त पठण वेदमूर्ती माधव शास्त्री भिडे यांचे मार्गदर्शनाखाली दिवशीकर कुटूंबिय यांचेकडून करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत रामकृष्ण पाठशाळेच्या भगिनी वर्गाचे विष्णूसहस्त्रनाम, भगवदगीता, मधुराष्टकम व श्रीकृष्ण स्त्रोतांचे पठण होणार आहे.

रविवारी रात्री जन्माष्टमीचे मुहुर्तावर वेदमूर्ती माधव शास्त्री भिडे, मयूरशास्त्री भिडे व सहकार्यांच्यावतीने विशेष पुजा, जन्मकाळ, जन्म अध्याय निरुपण, सहस्त्र तुलसी दल अर्पण, महाभिषेक, आरती व प्रसाद वितरण होणार आहे. सोमवार दि. 3 रोजी सायंकाळी 5 वाजता सातारा येथील सौ. विद्या दिवशीकर यांचे गोपाळकाल्या निमित्त लळीताचे किर्तन होऊन दही हंडी फोडून या जन्माष्टमी उत्सवाची सांगता होणार आहे अशी माहिती बाळासाहेब दिवशीकर यांनी दिली.

या जन्माष्टमी सोहळ्या निमित्त मंदिराला विशेष आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई तसेच महारांगोळ्यांनी सुशोभीत केले आहे. या सोहळयात सातारकरांनी मोठ्या संख्येने जन्माष्टमी, सहस्त्रतुलसी दल अर्पण कार्यक्रम, दही हंडी व काल्याचे किर्तन कार्यक्रमाला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा व आपला आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन दिवशीकर बंधु यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.