Your Own Digital Platform

प्रकल्पग्रस्तांंच्या बैठकीत ‘बिन बुलाये मेहमान’


पाटण : विद्यमान आमदारांना प्रकल्पग्रस्तांंच्या आंदोलनापासून मुद्दाम बाजूला ठेवणार्‍या आणि शेवटी नाईलाज झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला बिना आमंत्रणाचे जाऊन बसणार्‍या कोयना विभागातील शिवसेना पदाधिकार्‍यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी आपल्या राजकीय कारकिर्दीत एखादी तरी मिटिंग प्रकल्पग्रस्तांकरीता घेतली होती का, असा सवाल कोयना प्रकल्पग्रस्तांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे उपस्थित केला आहे.

पत्रकात म्हटले आहे की, युती शासनाच्या मंत्र्यांंना आंदोलनास बसलेल्या पाच हजार लोकांच्या समोर न आणता आंदोलनात प्रकल्पग्रस्तांचा आवाज नसून तिकडे भजन चाललेय असे मंत्र्यांना खोटे सांगून त्यांना वेगळ्या रस्त्याने विश्रामगृहाकडे नेणार्‍या शिवसेना पदाधिकार्‍यांंनी स्वतःची पात्रता तपासावी.

विद्यमान आमदारांनी प्रकल्पग्रस्तांंची मुख्यमंत्र्यांशी बैठक मीच लावली हे विधानभवनातून निघालेल्या पत्रात खाडाखोड करून केलेला केविलवाणा प्रयत्न प्रकल्पग्रस्त कार्यकर्त्यांनी जवळून अनुभवला होता.

खोट बोल पण रेटून बोल ही तुमच्या नेत्यांची कामे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मिटींगला आम्ही पण येणार हा हट्ट धरून बिन बुलाये मेहमान म्हणून अगोदरच जाऊन मिटिंग हॉल मध्ये तुम्हीच बसला होतात ना. मिटिंग संपायच्या आत कोयना विभागात आपल्या कार्यकर्त्यांना फोन करून मिटिंग मध्ये काही झाले नाही म्हणणारे तुम्हीच ना ! माजी आमदारांनी केलेल्या रस्त्यावरून गावागावात जायचे आणि रस्त्याचे काम केले नाही म्हणायचे, हे गेली चार वर्षे जनता ऐकत आली आहे.

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी प्रकल्पग्रस्तांंच्या प्रश्‍नाच्या संदर्भात अनेक तारांकित प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यांनी नागरी सुविधा मिळवून दिल्या याचा पुरावा देईन.पण तुमच्या नेत्यांनी लक्षवेधी केल्याच्या पोकळ वल्गना केल्या, ते तुम्हाला खरे वाटले,ही तुमचे अज्ञान नाही का? प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आमदारांकडे कार्यकर्त्यांना निवेदन द्यायला लावले,आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलनास बसलेल्या प्रकल्पग्रस्तांंकडे विद्यमान आमदार येऊ नयेत, कोयनेत आलेल्या मंत्र्यांनी आंदोलनाकडे जाऊच नये,ही भूमिका घेणारे तुम्हीच पदाधिकारी ना! पाटण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांनी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि आमदारांचे बेगडी प्रेम जवळून अनुभवले आहे. 

प्रकल्पग्रस्तांसाठी या मंडळींनी काही केले नाही. केवळ पत्रकबाजी करण्यापलीकडे यांना काही येतही नाही, असा आरोपही करण्यात आला आहे. पत्रकावर राजाभाऊ शेलार, श्रीपती माने, सचिन कदम, आनंद कदम, दत्ता देशमुख,लहुराज कदम व प्रकल्पग्रस्तांच्या सह्या आहेत.