सातारा जिल्हा होणार आता कचरामुक्त


फलटण : राज्यभर प्रामुख्याने शहरी भागात कचर्‍याची विल्हेवाट ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नातून ओल्या व सुक्या कचर्‍यावर प्रक्रिया करणारी केंद्रे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक नगर परिषद क्षेत्रात उभारण्यात येणार आहेत. त्यातून फर्नेस ऑईल आणि ऊर्जा निर्मितीचा प्रस्ताव पथदर्शी प्रकल्प म्हणून सातारा जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सातारा जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन आणि नावीण्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अभिनव प्रक्रिया प्रस्तावित करण्यात आली आहे. या बैठकीत नगर विकास खात्याचे सचिव, पर्यावरण सचिव अनिल डिगी कर, प्रदुषण नियंत्रण मंडळ सदस्य सचिव अनबलगम, स्वच्छ भारत अभियान कार्यकारी संचालिका सीमा ढमढेरे, सातारा जिल्ह्यातील नगर परिषदांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, आरोग्य सभापती व सदस्य उपस्थित होते.

या बैठकीतील निर्णयानुसार प्लॅस्टिक अथवा थर्माकोल सारख्या घटकांना वितळवण्याचे संयंत्र बसविण्यात येणार आहे. त्यातून जे अशुध्द तेल पदार्थ व उपपदार्थ निर्माण होतील त्यापासून उच्च दर्जाचे तेल व जैविक इंधन उत्पादीत केले जाणार आहे. उपरोक्त प्रस्तावित यंत्रणेपासून पुढे औष्णिक विद्युत निर्माण करण्यात येणार आहे. जैविक खते, जैवीकल्चर, निर्जलीकरण केलेले जैव द्रव्यमान याचे उत्पादन होणार आहे.

घनकचरा व्यवस्थापनाचे प्रस्थावित स्थळ व अनुषंगीक इतर प्रक्रियास्थळे योग्य अशा भौगोलिक ठिकाणी स्थापित केली जाणार आहेत. जिथे जैव इंधन, जैव तेल पदार्थ निर्माण होतील असे मध्यवर्ती प्लॅस्टिक प्रक्रिया केंद्र वाई अथवा खंडाळा परिसरात स्थापित केले जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्र स्थानिक पातळीवर जैव कचरा प्रक्रियेसाठी परिपूर्ण राहणार आहे. पुर्नप्रक्रिया न होणार्‍या कचर्‍याला वितळवून दररोज अंदाजे 10 टन कचर्‍यापासून तैलपदार्थ व इतर उपपदार्थ निर्मीतीसाठी मध्यवर्ती प्रक्रिया केंद्राकडे पाठविला जाणार आहे.

सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क, पुणे ही संस्था नवउद्योजकांच्या उत्कृष्ट, नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाला सर्वांगीण मदत देवून संवर्धीत करत आली आहे. केंद्राच्या विज्ञान, तंत्रज्ञान विभागाच्या निधीप्रयास योजनेंतर्गत हे तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्याच्या एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला सर्व बाबींचा लोकोपयोगी फायदा असल्याने व त्यातील तंत्रज्ञानाचा एकात्मिक उपयोग समाजास मोठ्या प्रमाणावर होणार आहे. 

हा प्रकल्प विकसित होण्यासाठी सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी पार्कने सर्वतोपरी सहाय्य केले आहे. उपरोल्लेखीत तंत्रज्ञानातील जैवीक मिथेन प्रक्रिया घटक हे प्रतिदिन किमान 10 किलोग्रॅम ओल्या कचर्‍यावर आणि जास्तीत जास्त 5 टनापर्यंत प्रक्रिया करण्यात येणार आहे. सुक्या कचर्‍यापासून फर्नेस आईल तयार करण्याबाबत प्रत्येक नगर परिषदेने प्रक्रिया केंद्र उभारावे, अशी सूचना ना.रामराजे नाईक निंबाळकर यांनी या बैठकीत केली. दरम्यान, उपस्थित अधिकार्‍यांनी याबाबत त्वरित कार्यवाही करुन प्रत्येक नगर परिषदेमध्ये असे केंद्र सुरु करण्यास सहमती दर्शविली आहे.

No comments

Powered by Blogger.