Your Own Digital Platform

मायणी जि.प., गटाच्या विकास कामांसाठी एक कोटी बत्तीस लाखांच्या विकास कामांना मंजूरी


मायणी : महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी खास बाब म्हणून मायणी जि.प. गटातील विविध विकास कामांसाठी एक कोटी बत्तीस लाख रुपयांच्या विकास कामांना मंजूरी दिली असून त्यातील रुपये पंचवीस लाखांचा निधी तातडीने सातारा जि.प. कडे वर्ग करण्यात आल्याची माहिती भाजपाचे युवा नेते व मायणीचे सरपंच सचिन गुदगे यांनी मायणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सचिन गुदगे पुढे म्हणाले, यापुढील काळात मायणी गावा सह संपूर्ण मायणी जि.प. गटात विकास कामांसाठी आमदार वा जि.प. सदस्याची गरज भासू देणार नाही . ना.पंकजाताई मुंडे यांनी माझ्या आग्रही मागणीमुळे सातारा जिल्हयात केवळ मायणीसाठी सत्त्याऐंशी लाख तर इतर गावांसाठी पंचेचाळीस लाख असा एकूण एक कोटी बत्तीस लाखाच्या विकास कामांसाठी शासनाच्या २५-१५ शीर्षकाखाली मंजूरी दिली असून त्वरीत कामे सुरु करण्यासाठी रुपये पंचवीस लाखांचा निधी जि.प. कडे वर्ग केला असल्याने त्वरीत विकासकामे सुरु करता येणार आहेत.

रुपये पंचवीस लाखाच्या तातडीने जि.प. कडे वर्ग केलेल्या निधीतून पुढीलप्रमाणे विकास कामे करण्यात येणार आहेत. पाचवड येथील जोतीबा मंदीरास कंपाऊंड करणे,बंदिस्त गटार व गावांतर्गत रस्ता क्राँक्रीटी करणासाठी रुपये ९ लाख, मोराळे येथील रामोशी समाजमंदिर, बंदिस्त गटार व अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण रुपये ९ लाख, अनफळे येथे बंदिस्त गटार व अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण रुपये ५ लाख व मायणी येथील यलमर वस्ती येथे हायमास पोलसाठी रुपये दोन लाख अशी एकूण २५ लाख रुपयांची विकासकामे ३१ मार्च २०१९ पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागास देण्यात आले आहेत.

तसेच उर्वरीत विकासकामांसाठी लागणारा विकास निधीही ग्रामविकास खात्याकडून लवकरच जिप. कडे वर्ग करण्यात येऊन ती देखील लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे सचिन गुदगे यांनी सांगितले.