Your Own Digital Platform

वर्ल्ड हेरिटेज कास पुष्प पठार


पठारावरील फुले उमलण्याचा कालावधी वेगवेगळा असल्याने एकाच वेळी सर्व प्रकारची फुले पहावयास मिळणे अशक्य आहे. 15 ते 20 दिवसांचे आयुष्य असणार्‍या असंख्य वनस्पती तेथे फुलत असतात. एका फुलाचे आयुष्य संपले की दुसरे फुल उमलायला सुरूवात होते ही केवळ निसर्गाची किमयाच. कास पठारामुळे सातार्‍याचा नावलौकिक साता समुद्रापार गेला आहे. 

युनेस्कोने 2012 साली कास पठाराला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आणि असंख्य पर्यटन प्रेमींची पावले कास पठार व परिसरात पडू लागली. 5-6 वर्षापासून पर्यटकांनी कास पठाराला भेट द्यायला सुरूवात केली.

यावर्षी प्रथमच वॉकीटॉकी द्वारे संवाद साधून संपूर्ण पर्यटकांवर नियंत्रण ठेवले जाते. तसेच पार्कींग व्यवस्था घाटाई फाटा येथे करण्यात आली आहे. समिती मार्फत कार्यक्षेत्रात येणार्‍या शाळांना शालेय साहित्याचे वाटप व गुणवंत्त विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. कासपठार परिसरातील 32 पाणवठ्यांवर वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच तिकीट विक्री करता 25 महिला कर्मचारी व 120 मजूरांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुसते शुल्क गोळा करावयाचे नाही तर पठारावर येणारा पर्यटक आनंदाने परत गेला पाहिजे. पर्यटकांना सेवा सुविधा देणे व जैव विविधतेचे रक्षण करणे हा मुख्य उद्देश समितीने डोळ्यासमोर ठेवून कामकाज सुरु आहे. 

येणार्‍या पर्यटकांसाठी अनेक सेवा सुविधा समितीने उपलब्ध केल्या आहेत. मोफत पार्किंग, मोफत गाईड आणि कॅमेरा शुल्क बंद केल्याने पर्यटकही सुखावले आहेत. पर्यटकांसाठी पार्किंगस्थळी, राजमार्ग आणि मुख्य गेटजवळ शौचालयाचे युनिट उभी करण्यात आली आहेत. पर्यटकांना पिण्यासाठी मिनरल वॉटरची तसेच निवारा शेड याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याकामी साताराचे सहाय्यक उप वनसंरक्षक भारतसिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक सातारा परळकर, मेढा वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, सातारा वन क्षेत्रपाल शितल राठोड यांनी मार्गदर्शन केले. निसर्गसंपदेचे रक्षण पर्यटकांना सोयी सुविधा आणि स्थानिकांना रोजगार हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कास पठार कार्यकारी समिती काम करत आहे. 

कास पठार परिसरात अनेक विलोभनीय अशी पर्यटनस्थळे आहेत. यामध्ये बामणोली बोटींग, शेंबडी बोटींग, कोयना धरणाचा अथांग शिवसागर जलाशय, कास तलाव, वजराई धबधबा, एकीवचा धबधबा, घाटाई देवी मंदिर इ. अनेक स्थळे पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत. स्थानिक लोकांना बरोबर घेऊन आणि सातारचे उपवन संरक्षक भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली कास पठारावरील पर्यटन हे हंगामी न राहता वर्षभर कसे राहिल यासाठी कास पठार कार्यकारी समिती कार्यरत राहणार आहे. तत्कालीन उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी सन 2017 च्या समितीच्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल समितीचा गौरव केला आहे. सर्व स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांनी सातारा जिल्हयाचे वैभव असलेले कास पुष्प पठार आणि कास पठारावरील जैवविविधता, वनसंपदा टिकवण्यासाठी सहकार्य करावे.- सोमनाथ जाधवकास कार्यकारी समिती अध्यक्ष