Your Own Digital Platform

रेशनिंगसाठीही मर्यादित उत्पन्नाचे हमीपत्र देणे बंधनकारक


कुडाळ : आता पुरवठा विभागाच्या धान्याचा लाभ घेण्यासाठी अंत्योदय, बीपीएल व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यातील ग्राहकांना आपले उत्पन्न मर्यादित असल्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. हमीपत्रानुसार दिलेली माहिती चुकीची आढळल्यास थेट शिधापत्रिकाच रद्द करून त्या ग्राहकांना धान्य योजनेच्या लाभापासून वंचित ठरविण्यात येणार असून त्याच्यावर जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.पुरवठा विभागामार्फत सद्यस्थितीत अंत्योदय,बीपीएल तसेच अन्नधान्य सुरक्षा योजनेअंतर्गत अल्प दरात धान्य वितरण करण्यात येत आहे. 

शासनाने ही योजना ज्यांचे उत्पन्न मर्यादा कमी आहे त्यांच्यासाठीच कार्यान्वित केली आहे. मात्र असे असताना काही ग्राहक उत्पन्न मर्यादा जास्त असतानाही या योजनोचा लाभ घेत आहेेत. शासनाच्या निकषानुसार ग्रामीण भागासाठी 44 हजार तर शहरी भागासाठी 59 हजार रू.कमाल उत्पन्न मर्यादा निश्‍चित केली आहे. त्यानुसार प्रत्येक ग्राहकाला या निकषानुसार शासनाला आपले उत्पन्न एवढ्याच प्रमाणात मर्यादित असल्याचे हमीपत्र सादर करावे लागणारे आहे. या हमीपत्रात उत्पन्न मर्यादेबाबत हमीपत्रात दिलेली माहिती चुकीची आढळल्यास याबाबतच्या शासनाच्या नियमानुसार शिधा पत्रिकेसाठी अपात्र ठरत असल्यास व तसे शिधावाटप प्राधिकार्‍यास कळविण्याची दक्षता न घेतल्यास आपण जीवनावश्यक वस्तू आधिनियम 1955 भारतीय दंड संहितेच्या तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहीन. दिलेली माहिती चुकीची असल्यास आपली शिधापत्रिका रद्द करण्यात आल्यास केंद्र शासनाकडे अथवा महाराष्ट्र शासन यांना जबाबदार धरणार नाही. तसेच याबाबत भविष्यात कोणालाही जबाबदार धरणार नाही अशा मजकुराचा समावेश आहे.

यामुळे आता काही ग्राहकांना चाप लागण्याची शक्यता आहे. उत्पन्न जास्त असलेली धान्याचा लाभ घेत असल्यास त्यांची शिधापत्रिकाच रद्द होणार आहे. यामुळे शासनाच्या वितरणाच्या धान्याच्या प्रमाणातही घट होण्याची शक्यता आहे. पुरवठा विभागामार्फत तशा सूचना ग्रामीण भागातील धान्य वितरकांना देण्यात आल्या असून याची अंमलबजावणी चतुर्थीनंतर होण्याची शक्यता आहे. शासनाने यापूर्वी केरोसीनचा लाभ घेणार्‍या ग्राहकांसाठी आपण गॅसची लाभार्थी नसल्याचे हमीपत्र लिहून घेतले होते. तसेच पॉस मशीनद्वारे धान्य वितरणाला सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे धान्य वितरणात बर्‍याच प्रमाणात पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होत आहे. यानंतर आता थेट धान्य वितरणातही हमी पत्राची अट लागू केल्याने ग्राहक वर्ग संभ्रमात पडला आहे.