डोळ्यात मिरचीपूड टाकून कराडच्या व्यापार्‍याची लूटमार


औंध : कळंबी ते औंध रस्त्यावर कराड येथील एका ज्वेलरी साहित्य विकणार्‍या व्यापार्‍याच्या डोळ्यांत मिरची पावडर टाकून अंदाजे तीस तोळे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना गुरुारी घडली आहे. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने औंध परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता लूटमारीच्या या घटनेस दुजोरा दिला. मात्र, याबाबत रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद झाली नव्हती.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर (कराड) येथील एका होलसेल सोने चांदीचे दागिने विकणार्‍या व्यापार्‍यास एका इसमाने आम्हाला ज्वेलरीचे शोरूम काढावयाचे आहे, दागिने घेऊन या असे सांगितले.कराड येथील व्यापारी पुसेसावळी येथे आले असता नंतर त्या इसमाने माझ्या शोरूममध्ये चला मी माणूस पाठवून देत आहे असे सांगितले. त्यानुसार त्या व्यापार्‍यास एका युवकाने दुचाकीवर बसवून दुपारी 12.30 च्या सुमारास कळंबी-औंध रस्त्यावर आणून नजीकच्या कॅनॉलजवळ थांबवले.त्या वेळेस पाठीमागून आलेल्या दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी व्यापार्‍याच्या डोळ्यात तोंडावर मिरची पावडर टाकून त्याच्याजवळ असणारी दागिन्यांची बॅग लंपास केली.

दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र याबाबत औंध पोलीस स्टेशनशी संपर्क साधून माहिती घेतली असता पोलिसांनी यास दुजोरा दिला. मात्र, नेमके किती सोने चोरीस गेले याचा तपशील त्यांच्याकडून उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र संबंधित व्यापार्‍याने 30 तोळे सोने लुटून नेल्याचा दावा केला आहे. दरम्यान, औंध ते कळंबी हा रस्ता नव्यानेच सुरू झाला आहे. या रस्त्यावर ही पहिलीच लुटमारीची घटना घडल्याने प्रवासी, वाहतूकदार यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

औंध येथे मागील तीन महिन्यापूर्वीही लूटमारीचा प्रकार घडला होता. त्यानंतर ही दुसरी घटना घडली असून या लूटमारीतील तो व्यापारी कोण त्यास कोणी फोन करून गंडवले याचे गूढ बनून राहिले आहे. त्यामुळे या टोळीचा पर्दाफाश करण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

No comments

Powered by Blogger.