Your Own Digital Platform

वाठार स्टेशन येथील वाग्देव चौक बनलाय मृत्यूचा सापळा


वाठार स्टेशन : वाठार स्टेशन येथील वाग्देव चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत आहे. याठिकाणी आतापर्यंत बरेच अपघात झाल्याने हा चौक मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जात आहे. याठिकाणी वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्याची गरज आहे.

वाठार स्टेशन येथील वाग्देव चौकात पश्‍चिमेकडून पोलादपूर-पंढरपुर राज्यमार्ग व दक्षिण-उत्तर सातारा ते पुणे राज्यमार्ग मिळतात. चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी असते. जवळच शाळा असल्यामुळे विद्यार्थांची सतत ये-जा सुरू असते. अशा वेळी येणाऱ्या जाणारे प्रवाशी, शाळेतील विद्यार्थी यांच्या जीविताला धोका असल्यामुळे येथे कायम ट्राफिक पोलिसाची गरज आहे. तसेच वाग्देव चौकात आजपर्यंत बरेच अपघात झाले आहेत.

 तरीही वाठार स्टेशन पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प का आहे. अजून किती अपघात होण्याची वाट बघत आहेत? असा प्रश्न वाठार स्टेशन पंचक्रोशीतील नागरिकांना व ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना पडला आहे. वाग्देव चौकात लवकरात लवकर वाहतूक पोलिसाची नेमणुक करावी, अशी मागणी वाठार स्टेशन ग्रामस्थ व प्रवाशी वर्गाकडून होत आहे.

वाग्देव चौक हा वाठार स्टेशन येथील मुख्य चौक असल्याने येथे सतत छोटे मोठे अपघात होत असतात तसेच वाहनांची येथे मोठया प्रमाणावर वर्दळ असते त्यामुळे येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात यावी.
– सतिश नाळे,
माजी उपसरपंच जाधववाडी