Your Own Digital Platform

नरेंद्र पाटलांच्या भाजप प्रवेशाने देसाई गटाला होणार फायदा


सणबूर : माजी आमदार नरेंद्र पाटील यांची भारतीय जनता पक्षाने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महमंडळाच्या अध्यक्षपदी निवड केल्याने एक प्रकारे माथाडींचा सन्मान केला आहे तर दुसरीकडे या निवडीमुळे ढेबेवाडी विभागातील राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजली असुन नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्याने तालुक्यातील पाटणकर गटाला मात्र मोठा धक्का बसला आहे.विधान परीषद सदस्यत्वाची मुदत संपताच माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी भाजपाशी जवळीक साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडून आपल्या वडीलांच्या नावाचे आर्थिक विकास महामंडळ पदरात पाडून घेतल्याने विभागात आनंदाचे वातावरण आहे. या निवडीने मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना आर्थीक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.

महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाने सध्या रान तापलेले आसताना अशावेळी भाजपातील वरीष्ठ नेत्यांनी राज्यातील इतर पक्षातील मराठा नेत्यांच्यावर लक्ष केंद्रीत केले होते. त्यापैकी एक माथाडी नेते नरेंद्र पाटील होते. मराठा मोर्चाच्या माध्यमातून मुंबई मध्ये नरेंद्र पाटील यांनी मराठ्यांच्या आरक्षणासह इतर मागण्यांसाठी रान उठवले तसेच मराठ्यांच्या अरक्षणासाठी कै. आ. आण्णासाहेब पाटील यांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे आण्णासाहेबांच्या घराण्याविषयी महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनात आदराची भावना होती. या घराण्याचा सरकारकडून सन्मान व्हावा अशी इच्छा तमाम मराठी बांधवांची होती. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना.चंद्रकांतदादा पाटील यांना क्षणोक्षणी जाणवत होते .

मुख्यमंत्री व ना.चंद्रकांतदादा हे माथाडीच्या कार्यक्रमाला अवर्जून उपस्थित रहात होते.काही महिन्यापूर्वी मुंबईतील माथाडी मेळाव्यास मुख्यमंत्र्यांना हजर राहता आले नाही तरीदेखील मोबाईलद्वारे भाषण करून माथाडी कामगारांची मने जिंकली . त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि आ. नरेंद्र पाटील यांच्यातील संबंध आधिक दृढ़ झाले होते. सुरूवातीला नरेंद्र पाटील यांना भाजपच्या कोट्यातून विधान परीषदेवर पून्हा संधी मीळेल आशी चर्चा होती परंतू काही दिवसातच या चर्चांना पूर्ण विराम मिळून त्यांना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ देण्यात आले.

या निवडीने मात्र पाटण तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या निमीत्ताने तालुक्यात भाजपला चांगला चेहरा मिळाला आहे.राज्यात युतीचे शासन असल्याने नरेंद्र पाटील यांना महामंडळाचे अध्यक्ष पद मिळताच विभागात चौकाचौकात आ. शंभूराज देसाई आणी मा. आ. नरेंद्र पाटील यांचे छायाचित्र आसलेले बॅनर झळकल्याने भाजप आणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. हे दोन्ही नेते भविष्यात एकाच व्यासपिठावर आल्यास तालुक्यातील राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे. नरेंद्र पाटील यांचे बंधू जि. प. सदस्य रमेश पाटील यांची भूमीका आजून गुलदस्त्यातच असल्याने कार्यकर्त्यात मात्र संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.

आगामी निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने स्वबळाचा नारा दिल्यास आ. नरेंद्र पाटील हे तालुक्यातील भाजपाचे उमेदवार असतील यात काही शंका असायचे कारण नाही. परंतू युती झाल्यास याचा फायदा मात्र आ. शंभूराज देसाई यांना होईल आ. देसाई, आ. नरेंद्र पाटील अनेकवेळा कार्यक्रमाच्या निमीत्ताने एकत्र आले होते या दोघांमध्ये याआधीच साखरपेरणी झाली आहे. शिवसेना आणी भाजप युती झाल्यास याचा फायदा आ. शंभूराज देसाई यांना होईल असेच काहीसे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.