Your Own Digital Platform

सातार्‍यातील गणेश विसर्जन : कृत्रिम तळ्यासाठी ९२ लाख लिटर पाणी


सातारा : सातार्‍यातील गणेश विसर्जनासाठी अखेर कृत्रिम तळ्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला. या तळ्याचे 40 फूट खोदकाम करण्यात आले असून तळे भरण्यासाठी सुमारे 92 लाख लिटर पाण्याची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी परिसरातील तीन विहिरींमधून पाणी घेण्यात आले असून तळे भरण्यास बुधवारी रात्री सुरुवात झाली.

गेली पंधरा दिवस विसर्जन तळ्यांची चर्चा सुरु आहे. तळ्यांचा प्रश्‍न मिटत नसल्याने घरगुती गणेशांचे विसर्जन पर्यायी ठिकाणी झाले. मोठ्या गणेश मूर्तींसाठी मोठे तळे शहरात उपलब्ध व्हावे यासाठी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून दोनच दिवसांत तीन जेसीबी, बुलडोझर आणि ब्रेकर यांच्या साहाय्याने कृत्रिम तळे खोदण्यात आले. 1 हजार 750 घनमीटर माती बाजूला करुन तळे काढण्यात आले. या तळ्याची खोली 40 फूट असून रुंदी 50 मी. व रुंदी 35 मी. आहे. हे तळे भरण्यासाठी 90 लाख लिटर पाण्याची आवश्यकता असून त्यासाठी परिसरातील तीन विहिरींतून पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय लगतच बुधवार नाका पाणी टाकीतून आवश्यकता भासल्यास पाणी घेण्यात येणार आहे.

संबंधित पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाने पाण्याचे कनेक्शन काढली असून चोवीस तासात तळे भरण्यासाठी किती पाणी लागेल यावरुन पर्यायी यंत्रणा वापरली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे 10 तर जलसंपदा विभागाचे 2 असे 12 टँकर तळे भरण्यासाठी वापरले जाणार आहेत. बुधवारी सायंकाळी तळ्यात कागद अंथरण्यात आला असून या तळ्यात रात्री उशिरा पाणी सोडण्यात आले. मात्र, दोन दिवसांत तळे भरण्यासाठी प्रशासनाला कसोशिने प्रयत्न करावे लागणार आहेत. दरम्यान, कृत्रिम तळ्याची पाहणी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर यांनी केली. त्यांनी तळे तसेच विसर्जन व्यवस्थेबाबत माहिती घेवून मुख्याधिकारी शंकर गोरे यांना कामकाजाबाबत सूचना केल्या. यावेळी जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी देविदास ताम्हाणे हेही होते.

गणेश विसर्जन मार्गाची पाहणी झाली आहे. विसर्जन स्थळी होणारी गर्दी टाळण्यासाठी यावर्षी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मोठ्या गणेश मूर्ती तसेच लहान मूर्तींसाठी दोन रॅम्प तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यकतेनुसार यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.