Your Own Digital Platform

सातार्‍यात संमिश्र प्रतिसाद


सातारा : काँग्रेस व राष्ट्रवादीसह विरोधकांनी पुकारलेल्या बंदला सातारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरू होते. ग्रामीण भागामध्ये व्यावसायिक व व्यापार्‍यांनी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दरम्यान, बंदच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात आली. तर, माकपने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी काँग्रेस, राष्ट्रवादी व विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती. सातारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. सातारा शहरात दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रॅली काढत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सातारा शहर व परिसरातील दुकानदार, व्यावसायिकांनी स्वत:हून बंदमध्ये सहभागी नोंदवला. मात्र, शहरातील परिस्थिती पाहता दुपारी 12 नंतर पुन्हा सर्व व्यवहार सुरु झाले. रिक्षा, प्रवासी वाहने, एस. टी. सेवा सुरळीत सुरु होती. शहरातील काही शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील सर्वच्या सर्व 11 आगारातील एसटी बससेवा सुरळीत सुरू होती. बंदच्या पार्श्‍वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. दरम्यान, सकाळी शहर व परिसरात शुकशुकाट जाणवत होता. राजवाडा, मोती चौक, खणआळी, स्टँड परिसर, पोवई नाका व अन्य परिसरातील दुकाने बंद होती. शहर व परिसरातील पेट्रोल पंप बंद होते. वडाप वाहतूकही सुरू होती. तर चौकाचौकात रिक्षाही थांबल्याचे दिसून आले. बंदसाठी दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन आवाहन केले होते. मात्र, हा बंद यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठोस अशी कार्यवाही केली असल्यामुळे बंदला प्रतिसाद लाभला नाही.