Your Own Digital Platform

बेकायदा वाळू साठा प्रकरणी किरण कुर्‍हाडेला ३९ लाखांचा दंड


सातारा : सातार्‍यातील करंजे पेठेत असलेल्या मेहर देशमुख कॉलनीतील खुल्या दोन प्लॉटवर सुमारे 110 ब्रास वाळूचा बेकायदा साठा केल्याप्रकरणी किरण अनिल कुर्‍हाडे (रा. 429, एकता कॉलनी, करंजे तर्फ सातारा) यांना 39 लाख 37 हजार 799 रुपयांचा दंड सातारा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी ठोठावला आहे. या दंडाची तहसीलदारांच्या आदेशाची नोटीस करंजे तलाठी एम. आर. डोईफोडे यांनी कुर्‍हाडे यांना दिली आहे.

करंजे तर्फ सातारा येथील मेहर देशमुख कॉलनीतील सर्व्हे नं. 411/2/28 मध्ये सुमारे 50 ब्रास, तर सर्व्हे नं. 322 मध्ये सुमारे 60 ब्रास असा एकूण 110 ब्रास बेकायदा वाळूचा साठा पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी उघडकीस आणून त्याची सातारा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांना कल्पना दिली होती. त्यानंतर सातारा मंडलाधिकारी एस. बी. पिसाळ यांनी बेकायदा वाळू साठ्याचा पंचनामा करुन तो सातारा तहसीलदार कार्यालयात सादर केला होता.

 त्यानंतर तहसीलदारांनी किरण अनिल कुर्‍हाडे यांना दंडाची नोटीस काढली आहे. या नोटीशीमध्ये म्हटले आहे, सातारा मंडलाधिकारी तसेच उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांनी केलेल्या कारवाईत सादर झालेल्या पंचनाम्यानुसार करंजे तर्फ सातारा येथे बेकायदा वाळूचा साठा केल्याचे आढळून आल्याने तुमच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार कारवाई का करु नये? याचा खुलासा सबळ पुराव्यासह नोटीस मिळाल्यापासून दोन दिवसांत उपस्थित करावा. यामध्ये कसूर केल्यास तुम्हाला याविषयी काहीही सांगायचे नसून पंचनामा व अहवालामध्ये दर्शवलेले अवैध गौण खनिज असून ते तुम्हाला मान्य आहे. असे समजून पुढील कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

सातारा तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार कुर्‍हाडे यांना खुलाशासाठी दिलेली मुदत संपून गेल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवई होणार हे निश्‍चित आहे. त्यानुसार तहसील कार्यालयात दंड आकारणीची दुसरी नोटीस काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. पंचनाम्यात 110 ब्रास वाळुचा बेकायदा साठा सापडल्याने रॉयल्टीच्या पाचपट दंड आकारला जाणार आहे. कुर्‍हाडे यांच्याकडून 110 ब्राससाठी 38 लाख 79 हजार 810 रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. शिवाय त्यांच्याकडून दंडाच्या 10 टक्के रक्कम सुमारे 57 हजार 981 रुपये जिल्हा खनिज प्रतिष्ठानला जादा भरावी लागणार आहे. सर्व मिळून 39 लाख 37 हजार 791 रुपये कुर्‍हाडे यांच्याकडून वसुल करण्यात येणार असल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले. दरम्यान, या दंडात्मक कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

करंजेत किरण कुर्‍हाडे यांच्या बेकायदा वाळू साठ्यावर दि. 7 रोजी कारवाई झाली. त्यानंतर दि. 11 रोजी सातारा तहसीलदारांनी दंडासाठी नोटीस काढून कुर्‍हाडे यांच्याकडू खुलासा मागवला. त्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली.मात्र, याबाबत माहिती घेतली असता कुर्‍हाडे यांनी अद्याप खुलासा सादर केलेला नाही. त्यामुळे कुर्‍हाडे यांच्यावर आतापर्यंत कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, तहसील कार्यालयाकडून अद्यापही कुर्‍हाडे यांच्याकडून दंड वसूल झालेला नाही. या कारवाईचे घोडे कुठे व का अडले? याची चर्चा सुरु झाली आहे.

सातारा जिल्ह्यात काही महसूल अधिकारी आपल्या हितसंबंधातील राजकीय कार्यकर्त्याला सोबत घेऊन वाळू धंद्यात पार्टनरशिपमध्ये असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळेच काही वाळू ठेकेदारांवर कारवाया होतात, तर काही वाळू ठेकेदार मोकाट सोडले जातात. घ्यायला-द्यायला एक मध्यस्थ तर चांगलाच चटावला असल्याची चर्चाही सुरू आहे. कोण कोण, कुठे कुठे पार्टनर आहे, याचीही पोलखोल केली जाणार आहे.