जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसलीदारांची पर्स चोरी


सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला तहसीलदार अमिता विजय तळेकर-धुमाळ (वय 40, रा. सातारा) यांच्या दालनातून बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांची पर्स व त्यातील दहा हजारांची रोकड चोरट्याने लंपास केली. जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या आवारातून चंदनचोरी झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातूनच तहसीलदाराचे पैसे चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अमिता तळेकर-धुमाळ या बुधवारी दिवसभर त्यांच्या दालनात काम करीत होत्या. सायंकाळी बैठकीच्या कामानिमित्त त्या जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात गेल्या. यावेळी धुमाळ यांनी स्वत:ची पर्स टेबलावर ठेवली होती. चोरट्यांनी हीच संधी साधत त्यांची पर्स लंपास केली. त्या पर्समध्ये दहा हजार रुपये, बँकेचे एटीएम, पॅनकार्ड, आधारकार्ड आदी महत्त्वाची कागदपत्रे होती.

तहसीलदार अमिता तळेकर यांची बैठक संपल्यानंतर त्या दालनात आल्या असता त्यांच्या टेबलवर पर्स नसल्याचे निदर्शनास आले. सर्वत्र पाहिल्यानंतरही पर्स नसल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एकच खळबळ उडाली. पर्स चोरट्याने चोरली असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. दरम्यान, मंगळवारी जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या परिसरातून चंदनाची सुमारे 10 ते 12 चंदनाची झाडे चोरीला गेली आहेत. मंगळवारी अशी घटना घडली असतानाच बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातच चोरी झाल्याने त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.

No comments

Powered by Blogger.