Your Own Digital Platform

लोकशाही व्यवस्थेवर घाला घालण्याचे काम भाजप सरकारकडून होत आहे : अशोक चव्हाण


कराड : लोकशाही व्यवस्थेवर घाला घालण्याचे काम भाजप सरकारकडून होत आहे. जातीवाद हे त्यांचे शेवटचे हत्यार आहे. निवडणुकीपुर्वी त्याचा वापर होईल. भाजप, आरएसएस यांची विशिष्ट विचारसरणी देशासाठी घातक आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी केला.

काँग्रेसच्या वतीने कोल्हापूरमधून सुरू करण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा रविवारी कराडमध्ये दाखल झाली. यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सदनमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील होते. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. सतेज उर्फ बंटी पाटील, आ. विश्‍वजित कदम, आ. जयकुमार गोरे, सचिन सावंत, प्रवक्ते राजू वाघमारे, सरचिटणीस रूपनवर, डॉ. इंद्रजित मोहिते, गट नेते शरद रणपिसे, तौफीक मुलाणी, निरीक्षक संजय बालुगडे, अजितराव पाटील चिखलीकर, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा चारूलता टोकस, धनश्री महाडीक, सरचिटणीस अ‍ॅड.मनिषा रोटे, फादर काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी रजनीताई पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

अशोकराव चव्हाण म्हणाले, आज देशभर अनागोंदी माजली आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशाच्या संसदेचे त्यांनी पावित्र्य राखले. पण मोदींच्या काळात देशाची सौदेबाजी सुरू आहे. हुकुमशाची विचार लादले जात आहेत. लोकशाहीवर घाला घातला जात आहे. जातीभेदाची विशिष्ट विचारसरणी रुजविली जात आहे. पण काँग्रेस पक्ष लोकशाहीवरील घाला निपुटपणे पहात बसणार नाही. जनतेनेही याचे गांभिर्य ओळखावे.

न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरण कोणाच्या दिशेने अंगुलीनिर्देश करते? देशाला आदर्श असणारे संविधान जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. इतिहास बदलला जात आहे, हे अधिकार भाजपला कोणी दिले. भाजप, आरएसएसची विचारसरणी देशासाठी घातक आहे. भाजपने बेटी बचावचा नार दिला, पण महिलांवरील अत्याचारात त्यांच्याच आमदारांची नावे समोर आल्याने भाजपवाल्यांपासून ‘बेटी बचाव’ म्हणण्याची वेळ आली आहे. अच्छे दिनच्या वल्गना करून मोदी सरकार सत्तेवर आले, पण आता या विषयावर बोलनेच त्यांनी बंद केले आहे. हा निवडणूक जुमला असल्याचे निर्लज्जपणे ते सांगत आहेत, हे देशाचे दुर्दैव आहे. या निवडणुकीच्या तोंडावर हिंदू, मुस्लिम, दलित असे जातीभेदाचे हत्यार भाजप व संघाकडून उपसले जाईल, यापासून जनतेने सावध रहावे, असेही खा. चव्हाण म्हणाले.

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, म.गांधी, पं. नेहरू, मौलाना आझाद या मंडळींनी गेल्या बाहत्तर वर्षात देशासाठी काहीच केले नाही, जे करतोय ते मीच अशा अविर्भावात मोदी वावरत आहेत. म. गांधी यांचे नावही घेण्याची आरएसएसची मानसिकता नव्हती, पण त्यांनी स्वच्छ भारत अभियानास म. गांधीचे नाव दिले. काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या योजना नाव बदलून हे सरकार राबवत आहे. काँग्रेसने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना तर त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम झाला आहे. अनेक घोषणा झाल्या पण एकाचीही अंमलबजावणी झाली नाही. मोदी विथ कॉमेडी नाईट शो सुरू आहे.

सत्तर वर्षात काँग्रेस सरकारने देशाची बसविलेली घडी मोदी सरकार उद्ध्वस्त करू पहात आहे. महापुरूषांना बदनाम केले जात आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचे फोटो लावणारांना देशद्रोही ठरवले जात आहे. अविचारी लोकांच्या हातात कारभार गेल्याने देश अधोगतीकडे निघाला असल्याचे विखे पाटील म्हणाले.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, नोटाबंदी हा जगाच्या इतिहासात मुर्खपणाचा निर्णय होता. नोटाबंदी, जीएसटीमुळे लघु, मध्यम उद्योगांचे कंबरडे मोडले. अनेक बेरोजगार झाले. शेतकरी उद्ध्वस्त झाला. नवीन रोजगार देणे दूरच पण होत्या त्या नोकर्‍याही मोदी सरकारने घालवल्या. चार वर्षापासून कृषी विकास दर शून्य टक्के आहे. अर्थव्यवस्था दहा टक्केवरून सात टक्केपर्यंत आली. शेतकर्‍यांना उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा देण्याचे आश्‍वासन मोदी सरकारने दिले होते, त्याची गत काय झाली? 34 हजार कोटीची कर्जमाफी देणार होते, प्रत्यक्षात दहा हजार कोटीच दिले. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. सर्वत्र सरकार विरोधात आक्रोश सुरू आहे. गोहत्याच्या नावाखाली झुंडशाहीने 29 जणांची हत्या केली. दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. विवेकवाद्यांच्या हत्या होत आहेत. संविधान, लोकशाही जिवंत राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मोदी सरकारला सत्तेवरून घालविण्याशिवाय पर्याय नाही. त्यांना घालवणे फारसे अवघड नाही. यासाठी महागठबंधन आवश्यक आहे आणि त्याची सुरूवात उत्तर प्रदेश व अन्य राज्यातून झाल्याचे त्यांनी सांगितले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, देशातील वातावरण बदलू लागले आहे. आषाढी एकादशीलाही मुख्यमंत्री जाऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. राज्य दिवाळखोरीत निघाले आहे. सामाजिक वातावरण दूषित झाले आहे. भिमा- कोरेगाव दंगलीचे सूत्रधार कोण हे शोधले नाही. मराठा, मुस्लिम, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न लोंबकळत ठेवला आहे. सहकार चळवळ ही महाराष्ट्राची ओळख होती ती चळवळच या सरकारने मोडीत काढली आहे. कर्जमाफीत शेतकर्‍यांची फसवणूक केली. 15 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. मंत्रालय चालवाय येत नाही येवढे निष्क्रीय भाजप सरकार आहे. काँग्रेस शिवाय देशाला पर्याय नाही. आ. सतेज पाटील, आ. विश्‍वजीत कदम, आ. सचिन सावंत, आ. अमर काळे, आ. शरद रणपिसे चारूलता टोकस यांनी भाजपच्या निष्क्रीय कारभाराचा पाढा वाचला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील यांनी स्वागत केले. मलकापूरचे उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे दक्षिण तालुका अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी आभार मानले. यावेळी हजारोंच्या संख्यने कार्यकर्ते उपस्थित होते.

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कराडमध्ये जनसंघर्ष यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. ओगलेवाडीपासून स्वागताचे मोठे फलक, झेंडे जागोजागी फडकत होते. स्वागत कमाणी मुख्य मार्गावर उभारण्यात आल्या होत्या. प्रचार, प्रसार योग्य पध्दतीने झाल्याने सभेला प्रचंड गर्दी झाली होती. टाऊन हॉल खचाखच भरला होता. तेवढेच लोक समोरील मैदानात बसून एलईडी स्क्रिनवर नेत्यांची भाषणे ऐकत होते. व्यासपीठाची व्यवस्थाही उत्तम प्रकारे करण्यात आली होती. आ. आनंदराव पाटील, मनोहर शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केल्याचे दिसून आले. मोठी गर्दी पाहून नेत्यांनीही आपल्या भाषणात समाधान व्यक्त केले.

सनातनवरील बंदीची मागणी आपल्या भाषणात अनेक नेत्यांनी केली. विखे -पाटील म्हणाले, धार्मिक दहशतवाद पसरवणार्‍या सनातन संस्थेवर बंदी घातली पाहिजे. युवकांचे ब्रेनवॉश करून त्यांच्याकरवी विचारवंतांच्या हत्त्या केल्या जात आहेत. सनातनचे जयंत आठवले यांना अटक करा, अशी मागणी मी केली आहे. सध्या सुरू असलेेले अटकसत्र, त्यांच्याजवळ सापडलेली घातक शस्त्रे, गावठी बॉम्ब पोलिसांनी शोधून काढले पण भाजप सरकार सनातनबाबत काय भूमिका घेणार याबाबत मुख्यमंत्री गप्प आहेत. देशविघातक कृत्य करणारांवर पोलिसांनी धडक कारवाई केली पण हे सरकार पोलिसांचे अभिनंदन करत नाही याचा अर्थ काय? दरम्यान सनातन संस्थेला सरकारचा राजाश्रय आहे, असा आरोप आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. मी मुख्यमंत्री असताना पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात सनातन ही देशविघातक व घातक संघटना असल्याने तिच्यावर बंदी घालण्यात यावी असे म्हटले होते. त्यानुसार 2011 मध्ये केंद्राकडे अहवालही पाठवला होता. सध्या अटकेत असलेले वैभव राऊत व त्याचे सहकारी यांच्याजवळ सापडलेला घातक शस्त्रांचा साठा, बॉम्ब ते कोणाविरोधात वापरले जाणार होते? यातून जातीय दंगली घडविण्याचा कट होता का? याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी आ. चव्हाण यांनी यावेळी केली.