Your Own Digital Platform

कुसुंबी येथील जयसिंग चिकणे यांचा स्वाईन फ्लूने घेतला बळी


मेढा : जावली तालुक्यातील कुसुंबी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व जावली बँकेचे माजी संचालक जयसिंग चिकणे (वय 45) यांचा स्वाईन फ्लूने बळी घेतला. स्वाईन फ्लूचा जिल्ह्यात आणखी फैलाव वाढू लागल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण आहे. दरम्यान, जयसिंग चिकणे या राष्ट्रवादीच्या उमद्या पदाधिकार्‍याचा या आजाराने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्‍त होत आहे. जिल्ह्यात सर्वत्र स्वाईन फ्लूची दहशत निर्माण झाली असून, संशयित रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. जयसिंग चिकणे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. 

ते आजारी असल्याने त्यांच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान त्यांच्या सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे आढळून आले होते. पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शुक्रवारी सकाळी 7 च्या सुमारास उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे जावली तालुक्यात शोककळा पसरली आहे. चिकणे यांनी कमी वयात राजकीय, सहकार, सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, बहिणी असा परिवार आहे.