Your Own Digital Platform

पाणी प्रश्नावर मतभेद बाजूला ठेवून एकत्र या : प्रभाकर देशमुख


वडूज : पाणी प्रश्नावर ग्रामस्थांनी एकमेकांचे मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येऊन एकजुटीने पाण्यासाठी काम करावे, तरच गावाचा पाण्याचा प्रश्न मिटेल, असे प्रतिपादन माजी कोकण विभाग आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केले.

तडवळे, ता. खटाव येथे ड्रीम सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून वृक्ष वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा बॅंकेचे संचालक अर्जुन खाडे, बाजार समितीचे उपसभापती डॉ. प्रकाश पाटोळे, सरपंच छाया पाटील, उपसरपंच पांडुरंग पाटोळे, विजय खाडे, डॉ. महादेव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

देशमुख म्हणाले, दुष्काळी खटाव-माण तालुक्‍यात कमी पर्जन्यमान असले तरी येथील जनता कष्ट करून ताठ मानेने उभी आहे. पावसाचे पाणी जलसंधारणाच्या कामांमुळे अडणार असून पहिल्या टप्यात तडवळे गावाने चांगले काम केले आहे. परंतु, इतर ठिकाणी आपण विकासकामांबाबत तुलनात्मकदृष्टया खूपच पिछाडीवर आहे. विकासकामांचा अनुशेष भरून काढण्याबरोबर सुबोधता निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. ड्रीम सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक गावांत फळझाडांचे वाटप केले आहे. शेतकऱ्यांनी या फळझाडांची चांगल्या प्रकारे जोपासना करावी. यावेळी देशमुख यांनी तडवळे गावांसाठी दोन हजार झाडांचे वाटप केले.

जिल्हा बॅंकेचे संचालक अर्जुन खाडे व रमेश शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमांचे प्रास्तविक व आभार डॉ. महादेव पाटील यांनी केले. यावेळी पोपट पळे, प्रकाश खाडे, विकास साबळे, दामोदर साबळे, दिलीप साबळे, केतन गोडसे, धनंजय निंबाळकर, फाळके गुरुजी, आप्पासाहेब साबळे, जालिंदर काळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.