Your Own Digital Platform

अतीत येथील स्वातंत्र्य सैनिकाची आजारपणास कंटाळून आत्महत्या


नागठाणे : अतीत (ता. सातारा) येथील स्वातंत्र्यसैनिक यांनी आजारपणाला कंटाळून वयाच्या 102 व्या वर्षी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली. सदाशिव कृष्णा यादव असे त्यांचे नाव आहे. या घटनेने अतीत गावासह परिसरातील गावांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत बोरगाव पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतीत येथे पतंगराव सदाशिव यादव हे आपल्या कुटुंबियांसह राहत आहेत. शुक्रवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास वयोवृद्ध वडील सदाशिव कृष्णा यादव हे घरात दिसत नसल्याने त्यांचा शोध घेतला.यावेळी ते राहत असलेल्या घराच्या पहिल्या मजल्यावरील गैलरीच्या खाली फरशीवर सदाशिव यादव हे गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे आढळले. घरच्यांनी तात्काळ गावातीलच डॉ. पवार यांना बोलावून तपासणी केली असता ते मृत झाल्याचे निदर्शनास आले.

या घटनेची खबर पतंगराव यादव यांनी बोरगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यांच्या राहण्याच्या खोलीतील बेडवर एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी व अतीत गावाच्या विकासासाठी कष्ट घेतले आहे. त्याचबरोबर मी आजारपणाला कंटाळून स्वखुशीने आत्महत्या करत आहे असे नमूद केल्याचे बोरगाव पोलिसांनी सांगितले. वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिक यांनी अश्‍या प्रकारे आत्महत्या केल्याने अतितसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हवालदार सुनील पाटील करत आहेत.