Your Own Digital Platform

नागनाथअण्णांची क्रांती नव्या पिढीला दिशा देणारी : रामराजे


सातारा : सातारच्या जेलमध्ये 75 वर्षांपूर्वी सिनेमात शोभावी अशी घटना घडली होती. क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी जेल तोडून 18 फुटावरुन क्रांतीकारक उडी घेतली. अण्णांनी केलेल्या क्रांतीची धगधगती मशाल नव्या पिढीला प्रेरणा देणारी आहे. 1942 सालच्या लढ्यातील स्वातंत्र्य सेनानींची डॉक्युमेंट्री तयार करण्यासाठी डीपीडीसीतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. त्यासाठी सरकारकडे आपण स्वत: पाठपुरावा करु, अशी ग्वाही विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी स्मारक कृती समितीच्यावतीने आयोजित केलेल्या ‘सातारा जेलफोड’च्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री ना. विजय शिवतारे, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. कैलास शिंदे, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, स्वातंत्र्य सैनिक बाबुराव घोरपडे, वैभव नायकवडी उपस्थित होते.

जिल्हा कारागृह येथे क्रांतीस्तंभास अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना ना. रामराजे म्हणाले, नागनाथअण्णांचा स्वातंत्र्य लढ्यातील आणि स्वातंत्र्यानंतरचाही कालखंड अतिशय धाडसी आहे. अण्णांची सामाजिक भूमिका कधीही दृष्टीआड करून चालणार नाही. विस्थापित आणि वंचितांचा आधारस्तंभ, सामाजिक चळवळीचा हिमालय असे त्यांच्या सामाजिक कार्याचे वर्णन करावे लागेल. त्यांच्या कार्याची उंची आज कोणीही गाठू शकणार नाही, त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील कार्य एकमेव द्वितीय असेच होते.

हा शौर्य दिन सातारकरांनी साजरा करायला हवा होता, पण ते आमचे दुर्दैव म्हणावे लागेल. नागनाथअण्णांनी जशी सातारा जेलची भिंत फोडली तशी आपण त्यांच्या विचारांनी जाती धर्माची भिंत फोडूयात. तरुणाईने अण्णांचा आदर्श घेऊन अन्यायाविरोधात लढा दिला पाहिजे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत ना. रामराजे यांनी व्यक्त केले. डीपीडीडीतून डॉक्युमेंट्री तयार करण्यासाठी निधी उपलब्ध झाला की, हे काम जगप्रसिद्ध असलेले पुण्याचे जब्बार पटेल यांना देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

ना. विजय शिवतारे म्हणाले, नागनाथअण्णा थोर स्वातंत्र्यसेनानी होते. वाळव्यात येऊन कार्यकर्ते गोळा करत ब्रिटिशांना सळो की पळो केले होते. त्यांचे पर्व हे रोमहर्षक ठरले होते. शाहू महाराजांच्यानंतर डॉ. नागनाथअण्णांनी समाजातील उपेक्षितांना साथ व न्याय दिला. कृतिशील पद्धतीने काम करण्याची पद्धत अण्णांमध्ये होती.

यावेळी डॉ. अनिल पाटील, वैभव नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सातारा, वाळवा येथील स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे वारसदार उपस्थित होते. यावेळी ‘पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा झिंदाबाद’, ‘भारत माता की जय,’ , ‘हुतात्मा किसन अहिर झिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.