सातार्‍यात शाळकरी मुलाची गळफासाने आत्महत्या


सातारा : सातार्‍यातील गुरुवार पेठेत राहणार्‍या जहीद इम्रान शेख (वय 12) या सहावीत शिकत असणार्‍या शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, शाळेत कॉपी पकडल्यानंतर त्याला नैराश्य आले होते व त्यातूनच हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी केला आहे.

याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातून मिळालेली प्राथमिक माहिती अशी, जहीद शेख गुरुवार पेठेत कुटुंबीयांसोबत राहत आहे. तो प्रतापगंज पेठेतील एका शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकत आहेे. शुक्रवारी शाळेची परीक्षा असल्याने तो शाळेत गेला होता. मात्र परीक्षेदरम्यान त्याने कॉपी केली होती. कॉपी पकडल्यानंतर शिक्षकांनी त्याला समज दिल्यानंतर जहीदने परीक्षेचा सर्व पेपर लिहून दिला.

जहीदने कॉपी केल्याचे घरीही समजले. परीक्षेत कॉपी केल्यापासून तो शांत व झोपूनच होता. शनिवारी दुपारी घरात कोणी नव्हते. याचवेळी त्याने घरी गळफास घेवून आत्महत्या केली. कुटुंबियांनी ही बाब पाहिल्यानंतर त्यांनी टाहो फोडला. परिसरातील नागरिक घटनास्थळी जमल्यानंतर जहीदला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. दुर्देवाने मात्र जहीद याचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली.

जहीद बाबतची माहिती नातलगांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. दरम्यान, शवविच्छेदन झाल्यानंतर कुटुंबियांना मृतदेह ताब्यात देण्यात आला. जहीद शेखच्या घरी आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

No comments

Powered by Blogger.