Your Own Digital Platform

सर्व्हर डाऊनचा घोळ सुटणार केव्हा?


सातारा : शासनाचा ऑनलाईन कारभार आणि प्रोसेस कानाला सुखवणारी असली तरी प्रत्यक्षात ऑनलाईन कागदपत्रे मिळवताना मात्र पालक व विद्यार्थ्यांची भंबेरी उडत आहे. सर्व्हर डाऊनच्या कारणाखाली अनेकांना 7/12 उतारे व अन्य कागदपत्रे मिळत नसल्याने शेतकरी वर्गाची अडचण वाढली आहे.

गेली दोन - तीन वर्षे ऑनलाईनच्या घोषणेने शासनाबद्दल सर्वसामान्यांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली होती. ऑनलाईन होणार म्हणजे आता सर्व काही अलबेल, विनासायास मिळणार. कागदपत्रे मिळवताना बटण दाबलं की प्रिंटरमधून 7/12 ची प्रत आणि ऑनलाईन दाखला मिळणार, या स्वप्नात मश्गुल असलेल्या नागरिकांना सर्व्हर डाऊन आहे, असे कारण सातत्याने ऐकवले जात असल्याने शेतकरी वर्ग, पालक, विद्यार्थी हैराण झाले आहेत.

7/12 ऑनलाईन करण्याची प्रोसेस सुमारे वर्ष दोन वर्षे झाले सुरु असून अनेक तालुक्यात ही प्रोसेस पूर्णत्वालाही गेली आहे. ऑनलाईनच्या प्रोसेसमुळे ग्रामीण भागात शेतकरी खातेदारांना अनेकदा अडचणी आल्या. पण, 7/12 ऑनलाईन मिळणार म्हणून या खातेदारांनी येणारे दिवसही ढकलले. काही तालुक्यात ही प्रोसेस संथ असल्याबद्दल जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांची खरडपट्टीही काढली होती. 

त्यानंतर या कामाला गती येवून 7/12 ऑनलाईन करण्याच्या प्रोसेसमध्ये कोरेगाव तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. याबद्दल कोरेगाव तहसीलदारांचा जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते गौरवही करण्यात आला. मात्र, ‘ये रे माझ्या मागल्या’ तसेच सुरु आहे.
सर्व्हर डाऊनमुळे महा ई सेवा केंद्रातूनही आवश्यक तो 7/12 शेतकर्‍यांना मिळू शकत नाही. यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या तातडीने दूर करणे गरजेचे आहे. या कामी काही अडचणी असल्यातर संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयाने त्याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयाला कळवून सर्व्हर डाऊनचा हा प्रॉब्लेम कायम संपवून टाकण्याची मागणी जनतेमधून होत आहे.

सेना-भाजप युती शासनाने सर्व्हर डाऊनचा हा घोळ तातडीने मिटवून बळीराजाला विनाविलंब 7/12 व अन्य कागदपत्रे मिळतील यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.