Your Own Digital Platform

शिवथर-गोवे रस्त्यावरून श्रेयवाद उफाळला


शिवथर : शिवथर-गोवे रस्त्याचे मंजूर काम पंतप्रधान योजनेतून नसून ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आहे. त्यासाठी मी स्वत: पाठपुरावा केला आहे. त्याचे पुरावे मी तुमच्यापुढे ठेवत आहे. माहित नसलेल्या कामांचे पोस्टर लावून आमदारकीची स्वप्ने पाहण्याचे प्रकार बंद करा. निवडणुका झाल्यावर ब्राझिलला गेले ते आत्ताच उगवले आहेत, अशा शब्दात आ. शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदे यांच्यावर टिकास्त्र सोडले.

आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते शिवथर-गोवे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जि. प. चे माजी कृषी सभापती किरण साबळे-पाटील, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, सभापती मिलिंद कदम, पंचायत समिती सदस्य राहुल शिंदे, दयानंद उघडे, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन व ग्रामस्थ उपस्थित होते.

आ. शशिकांत शिंदेे म्हणाले, हा रस्ता कोणत्या योजनेतून मंजूर आहे हेच त्यांना माहित नाही. नारळ फोडून भूमिपूजन करुन लोकांची दिशाभूल करण्याचे उद्योग आता थांबवा. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सातारा जिल्हा निवड समितीचे सदस्य आ. शंभूराज देसाई, आ. शशिकांत शिंदे, कार्यकारी अभियंता, पालकमंत्री विजय शिवतारे यांची सही असलेले मंजूर कामाचे पत्रही त्यांनी जाहीरपणे दाखवून दिले.

गेली चार वर्षे राज्यात भाजपचे सरकार आहे. या चार वर्षात मतदार संघात एकही फ्लेक्स बोर्ड दिसला नाही. माहित नसलेल्या कामांचे पोस्टर लावून आमदारकीची स्वप्ने पाहतात. त्यांच्या खोटेपणावर जनतेने विश्‍वास ठेवायचा का? असा प्रश्‍न उपस्थित करुन आ. शिंदे म्हणाले की, गेल्या चार वर्षात किती निधी उपलब्ध केला याचा खुलासा करावा. निवडणुका झाल्यावर ते ब्राझिलला गेले ते आत्ताच उगवले. त्यांच्यावर विश्‍वास ठेवायचा का? कुणी कितीही नारळ फोडू द्या, मी 75 हजाराच्या फरकाने निवडून येणारच, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विरोधकांनी केलेल्या कामाचे पुरावे द्यावेत, पोस्टर लावली त्या गावासाठी त्यांचे योगदान काय? हे सांगावे? असे आव्हान वनिता गोरे, किरण साबळे-पाटील यांनी दिले. स्वागत नवनाथ साबळे यांनी मानले तर आभार प्रकाश साबळे यांनी मानले.

शिवथर -गोवे रस्त्याच्या कामाला ना. चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच निधी मिळाला आहे. असे असताना नारळबाबा जातो नारळ फोडतो व मनाचे समाधान करतो. जनतेला गंडवले जात आहे. मात्र, सूज्ञ जनता आता हा सारा प्रकार ओळखत आहे, अशा शब्दात भाजपा नेते महेश शिंदे यांनी आ. शिंदे यांच्यावर घणाघाती टिका केली.

शिवथर-गोवे रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजप नेते प्रभाकर साबळे, हणमंत साबळे, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष संजय साबळे, निलेश नलवडे, महेश साबळे, वडूथचे सरपंच देवानंद साबळे, किशोर शिंदे, प्रकार साबळे, भरत साबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

महेश शिंदे म्हणाले, निवडणुका आल्याने नारळबाबा नारळ फोडत आहेत. भाजपाने पेयजल योजेनतून 49 कोटी रुपये मंजूर करुन आणले आहेत. नारळबाबा एका गावात पेयजल योजनेचा नारळ फोडायला जात असताना एका अधिकार्‍याला फोन करुन विचारले ही योजना खरच मंजूर आहे का व ती कशी झाली आहे व त्यास मंजुरी कोणी दिली? हे मला समजावून सांगा. अशा प्रकारची व्हिडीओ क्लिप माझ्याकडे आहे.

ते पुढे म्हणाले, नारळ का फोडला जातो हे जनतेने समजावून घेतले पाहिजे. त्यामागचे गमक म्हणजे एकदा नारळ फोडला की 10 ते 15 टक्के चालू झाले. गेल्या 18 वर्षात शिवथर-गोवे रस्ता करायला जमला नाही आणि आज त्यांना रस्त्याची स्वप्ने पडू लागली आहेत. आमदार गरीब आहेत. त्यांच्या घरातील राशन पाणी, गाड्यांचे डिझेल ठेकेदाराच्या पैशावर चालते. सर्वच जण कामे करत असतात. पण आमदारांना व त्यांच्या पुत्राला काम करताना बघितले आहे का? हे पैसे येतात कोठून हे जनतेने समजावून घेतले पाहिजे.

प्रभाकर साबळे म्हणाले, शिवथर येथील भाजपा प्रवेशावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्याची दूरवस्था पाहून निधी उपलब्ध करुन देण्याचे जाहीर आश्‍वासन दिले होते. त्यानुसार शिवथर -गोवे रस्त्याचे काम मंजूर केले आहे. मान्यवरांचे स्वागत व आभार हणमंत साबळे यांनी मानले.