Your Own Digital Platform

स्वाईन फ्ल्यूचे थैमान; पालिका डाराडूर


सातारा : जिल्ह्याबरोबरच सातारा शहरात स्वाईन फ्ल्यूने थैमान घातले असून दिवसेंदिवस त्याचा प्रकोप वाढत चालला आहे. मात्र, सातारा नगरपालिका याबाबत अद्यापही डाराडूर असून त्यादृष्टीने खबरदारीची कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. जिल्हा आरोग्य विभागाच्या एनयूएचएमने (राष्ट्रीय नागरी हेल्थ मिशन) शहरातील 7 हजार नागरिकांचा सर्व्हे केला असून त्यामध्ये 350 तापाचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

सातारा शहरात स्वाईन फ्लूचा विळखा वाढत चालला आहे. दमट हवामानाबरोबरच तापाची मोठी साथ उसळल्यामुळे दवाखान्यांमध्ये दररोज शेकडोंनी रुग्णांची वाढ होत आहे. मात्र, नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रशासकीय यंत्रणा ढिम्म आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनाही त्याचे फारसे काही देणेघेणे नसल्याचे चित्र आहे. 

त्यामुळे स्वाईन फ्लूचा मोठ्या प्रमाणावर प्रकोप वाढत चालला असून त्यावर कागदी कार्यवाहीचा सोपस्कार पार पाडला जात आहे. सातारा शहराबरोबरच उपनगरांमध्ये घाणीचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले असून हा उकिरडा उपासण्यात सातारा पालिकेबरोबरच लगतच्या ग्रामपंचायती ढिम्म आहेत. त्यामुळे डेंग्यू आणि चिकुनगुनिया हे साथीचे आजार पसरत आहेत. याकडे दुर्लक्ष करत यंत्रणा केवळ ‘स्वाईन’च्या कारणांची मीमांसा करत मूळ कर्तव्याला बगल देण्याचा प्रयत्न करत आहेत.

सातारा शहराला स्वाईन फ्लूने जखडले आहे. विशेष करुन मध्यवर्ती भागातील दाट लोकवस्तीतील झोपडपट्टीच्या भागात स्वाईनचे रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या तापांनी आजारी असणार्‍या रुग्णांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. हॉस्पिटलचा खर्च परवडणारा नसल्यामुळे त्याहून अधिक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. सातार्‍याचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले असताना सातारा नगरपालिका मात्र डाराडूर आहे. आरोग्य विभागाकडून अद्याप कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. 

रोगराई पसरु नये म्हणून साधी डीडीटी पावडरही न टाकणार्‍या या विभागाने स्वाईनच्या पार्श्‍वभूमीवर कोणतेही प्रतिबंधक उपाय केले नाहीत. अखेर जुन्या दवाखान्यातील कर्मचार्‍यांनी शहरात सर्व्हे सुरु केला आहे.