Your Own Digital Platform

कोणत्याही यात्रांनी भाजपला फरक पडणार नाही : नीता केळकर


सातारा : भाजपवर टीका करण्याचा विरोधकांकडे कोणताच मुद्दा नाही. म्हणून दिखाऊपणा करत भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडण्याचे काम काँग्रेसच्या संघर्ष यात्रेत झाले. चार वर्षानंतर त्यांना रस्त्यावर उतरण्याची बुद्धी आली आहे. जमिनीवर बसून जेवण्याची नौंटकी केली गेली यातून अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. अशा कोणत्याही यात्रांनी भाजपला काहीही फरक पडणार नाही, अशी टीका भाजपाच्या प्रभारी नीता केळकर यांनी काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेवर केली.

भाजपाच्या नऊ सदस्यीय कोअर कमिटीची पहिली बैठक मंगळवारी येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी काही समित्यांची रचना आणि झालेले निर्णय याची माहिती जिल्हा संयोजक भरत पाटील व नीता केळकर यांनी संयुकतरित्या पत्रकार परिषदेत दिली.

नीता केळकर यांनी काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेवर त्यांनी जोरदार टीका केली. राजकीय नैराश्यातून ही यात्रा काँग्रेसने काढली असल्याची टिका त्यांनी केली. त्या पुढे म्हणाल्या, सातारा, हातकणंगले, कोल्हापूर व सांगली लोकसभा मतदारसंघासाठी चार स्वतंत्र प्रभारी नेमण्यात आले आहेत. कोल्हापूर येथे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील त्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली. यात माझ्याकडे सातारा जिल्ह्याची जवाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी होणार्‍या 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेउन जिल्हा परिषद गट व विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्ह्यात 2 हजार 433 बूथ बांधणी व त्याचे अ, ब, क असे वर्गीकरण करण्याचे नियोजन आहे.

सातार्‍यात लोकसभेसाठी पक्षांर्तगत अनेकजण इच्छुक आहेत. मात्र त्याचा खुलासा आत्ताच करता येणार नाही, असे नीता केळकर यांनी सांगितले. उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाबाबत त्यांना छेडले असता त्या म्हणाल्या, उदयनराजे यांच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय धोरणात्मक आहे. प्रभारींना जिल्हानिहाय मायक्रो प्लॅनिंगचे आदेश आहेत. शासनातर्फ जिल्हयातील अडीच लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी झाली. तर मातृ योजनेचे जिल्हयात पन्नास हजार सभासद झाले आहेत.

भाजपची कोअर कमिटीत प्रभारी म्हणून नीता केळकर, सहाय्यक- विक्रम पावसकर, भरत पाटील, अनिल देसाई, मनोज घोरपडे, दीपक पवार, अविनाश फरांदे, सुवर्णा पाटील, कविता कचरे, संयोजक म्हणून भरत पाटील, कायदा सेलमध्ये अ‍ॅड प्रशांत खामकर, अमित कुलकर्णी, सोशल मिडियावर दिग्विजय सूर्यवंशी, संदीप भोसले, प्रिंट मिडियावर अनिल देसाई, अविनाश फरांदे, लाभार्थी सूचीमध्ये सुवर्णा पाटील, विकास गोसावी, कविता कचरे यांची नियुक्ती करण्यात आली.