मायणीच्या यशोदीप पतसंस्थेचे आजी- माजी चेअरमनना अटक व सुटका


मायणी : यशोदीप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत,मायणी ता. खटाव या पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन डॉ. मकरंद तोरो व माजी चेअरमन शिवाजीराव पाटील यांना कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांचे अजामीनपात्र अटक वॉरंट नुसारअटक करण्यात आली. या घटनेने तालुक्यासह जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे . दोघांनाही वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आले आहे.

याबाबत मायणी पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी - यशोदीप पतसंस्थेत ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवण्यासाठी ठेवीदार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच सातारा या न्यायालयात गेले होते. निवड्याकामी कोर्टात हजर राहण्यासाठी पदाधिकाऱ्यांना वारंवार बजावूनही ते हजर राहात नव्हते.तर एस .पी .मार्फत निघालेल्या अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात पोलीस यंत्रणेकडून दिरंगाई होत होती. गत दोन तीन वर्षापासून अटक वारंट अंमलबजावणी होत नसल्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या न्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांचेमार्फत वसुली अर्ज क्रमांक एक ४३ /११ अन्वये पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन डॉ. मकरंद तोरो व माजी चेअरमन शिवाजीराव पाटील यांचे नावे अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. 

त्या वारंट नुसार मायणीचे सपोनि संतोष गोसावी यांनी अंमलबजावणी करून यशोदीपचे चेअरमन डॉ.मकरंद तोरो व माजी चेअरमन शिवाजीराव पाटील यांना मायणी येथून अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून संबंधितांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा या कोर्टापुढे हजर केले असता कोर्टाने दोघांनाही वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडले.
पुढील सुनावणी १९तारखेला होणारआहे.ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्यावर अशा प्रकारची अटकेची कारवाई होत असल्याने ठेवीदारांच्या मध्ये ठेवी परत मिळण्याबाबतच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत . या घटनेचे जिल्हाभर तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे

No comments

Powered by Blogger.