Your Own Digital Platform

दरोड्याच्या तयारीतील ५ जणांच्या मुसक्या आवळल्या


सातारा : दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्‍या ५ युवकांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) मुसक्या आवळल्या. संशयितांनी कास, कण्हेर धरणासह ठिकठिकाणी प्रेमी युगुलांची लुटमार याच्यासह दुचाकी चोरी असे तब्बल २५ गुन्हे केले असल्याची धक्कादायक कबुली दिली असून पोलिस चोरीचा मुद्देमाल जप्त करत आहेत. दरम्यान, सर्व संशयित बुधवालेवाडी ता.खटाव येथील आहेत.

किरण बाळू बुधावले (वय 23), सतिश देवबा बुधवाले (वय 19), अक्षय लक्ष्मण बुधावले (वय 19), बाळू अंकुश बुधावले(वय 20 सर्व रा.बुधावलेवाडी) व अजय श्रीरंग जाधव (वय 27 रा.चिंचणी सर्व ता.खटाव) अशी अटक केलेल्या टोळीतील संशयितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा-पुसेगाव रस्त्यावर विसापूर फाट्यावर काही संशयित दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला समजली. त्यानुसार दि. 8 रोजी पोलिसांनी सापळा लावला असता त्यामध्ये वरील सर्व संशयितांना पकडण्यात आले. पोलिसांनी संशयितांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी धक्कादायाक माहिती दिली.

संशयितांनी टोळीच्या माध्यमातून कास, कण्हेर धरण, मेढा परिसर तसेच गणपतीचा माळ ता.खटाव येथे पर्यटक व प्रेमी युगुलांची लुटमार करुन त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू, रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतले असल्याच्या 9 गुन्ह्यांची कबुली दिली. घरफोडीच्या 3 गुन्ह्याची कबुलीही दिली. याशिवाय नेर, डिस्कळ ता.खटाव, आंद्रुड ता.फलटण, स्वारगेट एसटी स्टँड येथील 4 पल्सर व 1 स्प्लेंडर अशा 5 दुचाकी चोरल्या. शेतीवरील इलेक्ट्रीक मोटारी व निर्जन परिसरात एकट्याला गाठून अनेक जबरी चोरी केल्याची कबुलीही संशयित चोरट्यांनी दिली. पोलिसांनी सर्व गुन्ह्यांची खातरजमा केली असता एकूण 25 गुन्ह्यांची कबुली संशयित चोरट्यांनी दिली आहे.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि पद्माकर घनवट, फौजदार प्रसन्न जर्‍हाड, शशिकांत मुसळे पोलिस हवालदार सुरेंद्र पानसांडे, विजय जाधव, मोहन घोरपडे, विजय शिर्के, तानाजी माने, कांतीलाल नवघणे, रामा गुरव, विजय कांबळे, संतोष पवार, शरद बेबले, प्रवीण फडतरे, नितीन गोगावले, निलेश काटकर, अर्जुन शिरतोडे, विक्रम पिसाळ, मोहसीन मोमीन, प्रमोद सावंत, संजय जाधव, विजय सावंत, गणेश कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.