Your Own Digital Platform

डॉल्बी नाही म्हणजे नाहीच : नांगरे-पाटील


सातारा : खा.उदयनराजे यांच्या ‘डॉल्बी वाजणारच’ या वक्‍तव्याबाबत पोलिस व लोकप्रतिनिधींचा कोणताही संघर्ष नाही व आमचीही संघर्षाची भूमिका नाही. डॉल्बीचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळे डॉल्बी नाही म्हणजे नाहीच. यंदा डॉल्बीविरहीत गणेशोत्सव व्हावा, अशी पोलिसांची भूमिका आहे. मात्र, कोणी आक्षेपार्ह विधान करत असेल त्यावर कारवाई केली जाईल, अशी भूमिका कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी सातार्‍यात मांडली.दरम्यान, यामुळे गणपती कालावधीत पोलिस व मंडळांमध्ये वाद होणार की डॉल्बी विरहीत गणेशोत्सव होणार? याकडे आता जिल्हावासियांचे लक्ष राहणार आहे. सातार्‍यातील पोलिसांच्या शिवतेज हॉलमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख व अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार उपस्थित होते.

विश्‍वास नांगरे-पाटील म्हणाले, गणेशोत्सव व मोहरम हे महत्वाचे दोन सण येत्या दहा दिवसांमध्ये होणार असून त्या पार्श्‍वभूमीवर सातारा पोलिस दलाची आपण बैठक बोलवली आहे. प्रसिध्दी माध्यमातून गणेशोत्सव कसा साजरा करावा. याबाबत पोलिसांची भूमिका कशी सकारात्मक आहे हे त्यांनी सांगितले.

सातार्‍यात डॉल्बी वाजणारच, असे खा.उदयनराजे वक्‍तव्य करत आहेत, याबाबत पोलिसांची भूमिका काय आहे? असा प्रश्‍न विचारल्यानंतर आयजी विश्‍वास नांगरे-पाटील म्हणाले, कायदा सर्वांना समान आहे. सातारा पोलिस दल व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये कोणताही संघर्ष नाही. तसेच सणाचा कालावधी असल्याने आमची कोणतीही संघर्षाची भूमिका नाही. हा उत्सव तुमचा तसाच आमचाही आहे. उलट एकही गुन्हा दाखल न होता हा उत्सव पार पडावा, अशी पोलिसांची अपेक्षा आहे. डॉल्बीबाबत कुठे आक्षेपार्ह विधान होत असेल तर त्याबाबत कारवाई केली जाईल. मुळात चुकीचे आहे ते टाळण्यासाठी सर्वांनी सकारात्मक रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कर्कश डॉल्बी वाजू नये, सामाजिक आरोग्याचा बचाव व्हावा, असा पोलिसांचा उद्देश आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवताना त्याचे कुठे उल्‍लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल. समाजातील सर्व मंडाळांनी समाजहिताचे देखावे, उपक्रम राबवावेत. त्या त्या मंडळांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपला सर्व परिसर कसा सुरक्षित राहील, यासाठी प्रयत्न करावेत. डॉल्बी, बिभत्स गाणी ही आपली संस्कृती नाही. डॉल्बीचे अनेक दुष्परिणाम आहेत, असेही ते म्हणाले.

यंदा डॉल्बी, बेस व त्याच्या भिंती, मॉडीफाय केली जाणारी वाहने यावर पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकार्‍यांना याबाबत सांगून मॉडीफाय केली जाणारी वाहने पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना घटनास्थळीच जप्‍त करण्याचे आदेश दिले जावेत. शहरात आतमध्ये येण्यापूर्वी जर अशा वाहनांवर कारवाई केली तर ते शहरात येवून वाजण्याचा विषय उरणार नाही.

सातार्‍यातील मोक्‍का व तडीपार सत्र कायम सुरु राहणार असल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. कोल्हापूर परिक्षेत्रात आतापर्यंत एकूण 96 मोक्‍काअंतर्गत प्रस्तावांना मंजुरी दिल्याचे सांगून लवकर सेंच्युरी ठोकणार असल्याचे ते म्हणाले, तडीपारीची आकडेवारीही दोन हजाराहून अधिक झालेली आहे. माणचे राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांच्यावरील मोक्‍काबाबत ते म्हणाले, कोल्हापूर परिक्षेत्रातून त्याला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, चार्जशीट दाखल होत असताना वरिष्ठ अधिकारी कायदेशीर सल्‍ला घेत असतात. त्यामध्ये त्यांचा मोक्‍का निघाला असून मूळ तक्रार कायम असल्याचे नांगरे -पाटील यांनी सांगितले.

विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी जीवीताला धोका असल्याबाबतचे वक्‍तव्य केल्याबाबत ते म्हणाले, याबाबत मीडियामधून आपण वाचले आहे. त्यांनी जर पोलिस प्रशासनाकडे तक्रार दिली तर निश्‍चित त्याचा तपास करुन कारवाई केली जाईल, असे विश्‍वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. दरम्यान, खा.उदयनराजे भोसले व ना.रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाबाबत पोलिस दलाने त्यांना नोटीस दिल्या आहेत का? असे विचारले असता ते म्हणाले, दोन्ही नेत्यांच्या संपर्कात पोलिस अधीक्षक आहेत. ते दोन्ही नेते आहेत.