नवनाथांच्या वास्तव्यांने पावन झालेले श्री क्षेत्र सोनेश्‍वर


ओझर्डे : ओझर्डे, ता. वाई गावच्या पश्‍चिमेला दीड किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या नवनाथांच्या वास्तव्याने पावन झालेले श्री क्षेत्र सोनेश्‍वर अशा नावाने सर्वत्र परिचित आहे. येथील देखणा निसर्ग सौंदर्य असल्याने येथे भाविकांची गर्दी असते. प्रत्येक सोमवारी या ठिकाणी भाविकांमार्फत महाप्रसादाचे आयोजन येथील सेवेकरी मंडळा मार्फत केले जाते. नवनाथापैकी मच्छिंद्रनाथांनी कृष्णा नदीतील डोहात टाकलेल्या सोन्याच्या विटेवरुन या तिर्थ क्षेत्राला सोनेश्‍वर असे नाव पडले आहे. 

तेव्हा पासून आजपर्यंत या डोहातील पाणी कधीच आठले नाही. त्याचा तळही कधी सापडला नाही. या ठिकाणी मंदिर परिसरात सपाटीकरण केल्यानंतर मातीच्या ढिगार्‍याखाली पाच जिवंत समाधी घेतलेल्या अवस्थेतील मानवी सांगाडे सापडले आहेत. दगडी बांधकाम केलेल्या समाध्या सापडल्या आहेत. या समाधीच्या तोंडावर गोल मोठ्या दगडी चाकांच्या आकारांचे झाकण असून त्यावर सूर्याचे चिन्ह आहे. त्यामुळे ते सूर्य उपासक असावेत, असा अंदाज पुरातत्व खात्याने वर्तवला आहे.

या ठिकाणी जागृत महादेवाचे पुरातन हेमाडपंथी मंदिरे आहेत. नित्य नियमाने आरती रुद्राभिषेक मंत्रोच्चारात केले जातात. श्रावणात व चातुर्मासात शेकडो भक्त गण गुरु चरित्रांचे पारायणे करतात. पुणे सातारा जिल्ह्यातील अनेक ग्राम दैवताच्या पालख्या आणी कावडी नदीत स्नान करुन येथील महादेवाच्या भेटीला येतात. त्यावेळी या सोनेश्‍वर परिसराला जत्रेचे स्वरुप येते. यावेळी ओझर्डे ग्रामस्थ व दत्त सेवेकरी मंडळा तर्फे महाप्रसाद दिला जातो.

No comments

Powered by Blogger.