Your Own Digital Platform

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रमशाळेतील मुलांना खेळाच्या साहित्याचे वाटप


तरडफ :

 बालपण देगा देवा |
मुंगी साखरेचा रवा | ,
बालपणीचा काळ सुखाचा |
मौजमजेचा आनंदाचा |

अशी वाक्ये वाचनात आली की प्रत्येकाला आठवते ते वाळूच्या कणांसारखे आपल्या हातून निसटून गेलेले अल्लड आणि निरागस बालपण. या लहान वयात मुलांना खेळ, गाणी, गप्पा, गोष्टी या सर्वांत जास्त प्रिय काय असेल तर ते म्हणजे खेळ. खेळ म्हटले की लहान मुले तहान-भूकच काय तर काही क्षणांसाठी आपल्या आईवडिलांनाच नव्हे तर स्वतःला सुद्धा विसरून जातात.

अभ्यासाने बुद्धी आणि मन तल्लख तर खेळाने आरोग्य आणि तन म्हणजेच शरीर निरोगी आणि निकोप बनते. या सर्व गोष्टींचा विचार करून सासवड, ता. फलटण, जि. सातारा येथील कै. सौ. संगीता कालिदास पंडित यांच्या स्मरणार्थ आई फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि श्री व सौ. पंडित परिवाराच्या संकल्पनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रमशाळा, साखरवाडी येथील मुलांना खेळाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सोनवणे सर, पदवीधर शिक्षक श्री. नवले सर, श्री. बोत्रे सर, श्री. शिंदे सर, आश्रमशाळा वसतिगृह अधिक्षक श्री. येळे सर, महात्मा फुले वसतिगृह अधिक्षक श्री. माने सर आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे सचिव श्री. हरिष गायकवाड यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी सर्व मुले खूपच आनंदात होती.

करील रंजन जो मुलांचे |
जडेल नाते प्रभूशी तयाचे |

साने गुरुजींच्या या उक्तीप्रमाणे आश्रमशाळेतील मुलांचे मनोरंजन करण्याचे भाग्य आम्हाला लाभले अशी भावना श्री व सौ. पंडित कुटुंबियांच्या मनात एक वेगळाच आनंद देऊन गेली. यापुढे सुद्धा आई फाऊंडेशनच्या माध्यमातून आश्रमशाळेतील मुलांसाठी दरवर्षी वेगवेगळी मदत करण्याचा श्री व सौ. पंडित परिवारातील सर्व सदस्यांचा मानस आहे.