Your Own Digital Platform

अधिकारी दगड घेऊन तक्रारदारांच्या मागे


सातारा : वर्ये, ता. सातारा येथील युनियन स्कूल जवळील डी.पी. बदलण्यासाठी ग्रामस्थांनी 4 महिन्यापूर्वी वीज कार्यालयात अर्ज केला होता. बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास महादेव बेबले व काही ग्रामस्थ गोडोली येथील वीज कार्यालयात अधिकारी असलेल्या सचिन यादव यांच्याकडे चौकशीसाठी आले होते. यावेळी वादावादी होवून अधिकारी यादव हे चक्क तक्रारदार बेबले यांच्या मागे दगड घेऊन लागले. बराच गोंधळ उडाल्याने उपस्थितांनी हस्तक्षेप करुन वातावरण शांत केले. दरम्यान, सहाय्य्क अभियंता विजयकुमार जाधव यांनी संबंधित अधिकार्‍याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवून त्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

वर्ये येथील युनियन स्कूल जवळील डीपीमध्ये वारंवार तांत्रिक बिगाड होत आहे. त्यामुळे या परिसरातील 10 हुन अधिक घरे वारंवार अंधारात राहत आहेत. पिण्यासाठी, शेतीसाठी, जनावरांसाठी पाण्याचे हाल होत आहेत. त्यात परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. काही महिन्यापूर्वी येथील महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. याला कारणही महावितरणच आहे. कारण यावेळी वीज पुरवठा खंडित झाला होता. वर्ये ग्रामस्थांनी गेल्या चार महिन्यांपूर्वी डीपी बदलावा, असा अर्ज कार्यालयास दिला होता. यावर ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा केला मात्र, अधिकार्‍याकडून टोलवाटोलवी करण्यात येत होती. बुधवारी तक्रारदार महादेव बबन बेबले हे गोडोली येथील कार्यालयात चौकशीसाठी गेले होते. यावेळी त्यांना ताटकळत बसवून नंतर या अधिकार्‍याकडे जावा त्या अधिकार्‍याकडे जावा असे सांगण्यात आले. शेवटी त्यांना सचिन यादव या अधिकार्‍याकडे जाण्यासाठी सांगितले. यावेळी या दोघांमध्ये वादावादी झाली त्यावर अधिकार्‍याचा पारा चढला आणि चक्क तो बाहेर येऊन बेबले यांच्यामागे दगड घेऊन लागला. या प्रकारानंतर गोडोली कार्यालयात चांगलाच गोंधळ उडाला.

काही वेळात सहाय्यक अभियंता विजयकुमार जाधव हे कार्यालयात दाखल झाले. सर्व प्रकारची माहिती घेत त्यांनी वर्ये ग्रामस्थांकडे दिलगिरी व्यक्‍त करत सोमवार दि 10 पर्यंत डीपी बसवण्याचे आश्‍वासन दिले. तर संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करत त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली. यावर ग्रामस्थांनी सोमवारपर्यंत डीपी न बसल्यास मंगळवारी गोडोली कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला.