बेकायदा गर्भपात औषधप्रकरणी चार्जशीट


सातारा : हिरापूर (ता. सातारा) येथे दोन महिन्यांपूर्वी सापडलेल्या बेकायदा गर्भपातांच्या औषधसाठ्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने कोर्टात चार्जशीट दाखल केली. पोलिसांसह औषध विभागाचे पथक बनावट औषधांचे नमुने घेऊन उत्तराखंडच्या सायनोकेम फार्मास्युटिकल्स प्रा. लि. हरिद्वार या कंपनीतील औषधांची तपासणी करणार आहे. त्यासाठी औषध प्रशासन पुढील कारवाईसाठी कोर्टाची परवानगी घेणार आहे.जिल्ह्यात बनावट औषध विक्री करणारे रॅकेट औषध विभागाने उघडकीस आणले होते.

 हिरापूर येथे गर्भपाताची बेकायदा औषधांची विक्री सुरू असल्याचे समजल्यावर या प्रकरणात काही जणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. शिवाय, सातार्‍यातील दोन मेडिकल्सचे परवानेही निलंबित करण्यात आले. औषध विभागाने ताब्यात घेतलेली ‘जस्टाप्रो’ तसेच ‘कामकिट’ ही उत्तराखंड स्थित असलेल्या सायनोकेम फार्मास्युटिकल्स प्रा. लि. हरिद्वार या कंपनीची औषधे जप्त करण्यात येवून संबंधित कंपनीला कळवण्यात आले. कंपनीच्या प्रतिनिधीने ही औषधे कंपनीची नसून बनावट असल्याचे स्पष्ट केले. औषध विभागाची ही कार्यवाही सुरु असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने प्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन दोषींविरोधात कोर्टात चार्जशीट दाखल केली. 

मात्र, औषध विभागाकडून या कारवाईत अपेक्षित प्रगती झाली नाही. त्यामुळे या विभागाच्या भूमिकेबद्दल साशंकता व्यक्त होत होती. मध्यंतरीच्या काळात याप्रकरणाकडे दुर्लक्ष झाले. आता मात्र औषध विभागाने कडक धोरण अवलंबले आहे. सातार्‍यात जप्त केलेले ‘जस्टाप्रो’ तसेच ‘कामकिट’ ही औषधे बनावट आहेत की सायनोकेम फार्मास्युटिकल्य प्रा. लि. कंपनीची आहेत, याची चौकशी करण्यात येणार आहे. औषध विभाग त्यासाठी पोलिसांच्या मदतीने उत्तराखंडला कंपनीस भेट देणार आहेत. त्याठिकाणच्या औषध निर्माण करणार्‍या विभागास भेट देणार आहे. कंपनीतील बनवली जाणारी गर्भपाताची औषधे तसेच अधिकार्‍यांना कारवाईत सापडलेली बनावट औषधे यांची चौकशी त्याठिकाणी केली जाणार आहे. मात्र, त्यासाठी औषध विभाग कोर्टाची परवानगी घेवून ही पुढील कारवाई करणार आहे. कारवाईवेळी जस्टाप्रोच्या 16 स्ट्रिप्स तर कामकिट औषधाचे 2 किट जप्त करण्यात आली होती. जस्टाप्रोची 8 स्ट्रिप्स व 1 कामकिट नमुन्यासाठी घेतले जाणार असल्याची माहिती औषध विभागातील सूत्रांनी दिली.

No comments

Powered by Blogger.