Your Own Digital Platform

बारसं कोणीही घातलं तरी पोरगं आमचंच


म्हसवड : उरमोडी उपसा सिंचन योजनेचे पाणी माझ्या माण आणि खटाव तालुक्याच्या हक्काचे आहे. इथल्या मातीची आणि जनतेची तहान भागल्याशिवाय या पाण्याचा एक थेंबही देवापूरच्या पुढे जाऊ देणार नाही, असा इशारा आ. जयकुमार गोरे यांनी दिला. या पाण्यासाठी मी आणि माझ्या सहकार्‍यांनी खूप परिश्रम आणि संघर्ष केला आहे. त्यामुळे पाणी आल्यावर आता जलपूजनाचे बारसे कुणीही घातले तरी पोरगं आमचेच असल्याचे आ. गोरे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

म्हसवड येथे रथगृहाशेजारील बंधार्‍यात उरमोडीच्या पाण्याचे पूजन केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला भगवानराव गोरे, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, विजय धट, डॉ. वसंत मासाळ, आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.

आ. जयकुमार गोरे पुढे म्हणाले, म्हसवडमध्ये खरी गरज होती तेव्हा मागेच उरमोडीचे पाणी आले असते. मात्र, गावच्या वेशीवर आलेल्या पाण्याबाबत काही बाजारबुणग्यांनी खोटा कळवळा आणून विनाकारण आंदोलनाचे नाटक केले. काँग्रेसच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहकार्याने उरमोडीचे पाणी जयकुमारने माण तालुक्यात आणले, हा इतिहास कुणीच नाकारु शकत नाही. पहिल्यांदा मी पाणी आणले तेव्हा पूर येईल, गावात रोगराई पसरेल, असे कोकलणारे लबाड लोक आता त्याच पाण्याचे पूजन करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत.

आ. गोरे म्हणाले, उरमोडीच्या पाण्यासाठी मी रात्रंदिवस परिश्रम केले आहे. फलटणकर नसते तर 20 वर्षांपूर्वीच हे पाणी माणमध्ये आले असते. सध्याचे मुख्यमंत्रीही उरमोडीचा विषय निघाला की जयकुमारचे नाव घेतात. उरमोडीचे पाणी हवे असेल तर आमच्या 16 गावांना टेंभूचे पाणी द्यावे लागेल. भाजपा मंत्र्यांनी तसा निर्णय घेतल्याचे समजत आहे. महाबळेश्‍वरवाडीच्या तलावातून पुढे गावांना ते पाणी कसे जाणार याचे स्पष्टीकरण त्यांनी जनतेला द्यावे, असेही आ. जयकुमार म्हणाले.

कार्यक्रमात विजय धट, नितीन दोशी, संजय जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना कायम जनतेबरोबर रहाणार्‍या आ. गोरेंच्या पाठीशी जनसैलाब उभा असल्याचे तसेच विरोधकांमध्ये कोणतेच विकासकाम करण्याची धमक नसल्याचे सांगितले. प्रास्तविक डॉ. मासाळ यांनी तर सूत्रसंचलन दिगंबर राजगे यांनी केले. यावेळी सोमनाथ भोसले, दादा काळे, अकिल काझी, लुनेश विरकर, बाळासाहेब पिसे, शशिकांत गायकवाड आदी उपस्थित होते.