Your Own Digital Platform

१३१ धोकादायक इमारती मुळावर
सातारा : सातार्‍यातील बेकायदा इमारतींची संख्या वाढत असतानाच शहरात जीर्ण व धोकायदायक इमारतींची कमी नाही. सातारा नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वी केलेल्या सर्व्हेत 151 इमारती धोकादायक असल्याचे आढळले होते. त्यापैकी 20 इमारती संबंधित मालकाच्या पूर्व परवानगीने जमीनदोस्त करण्यात आल्या. मात्र, अद्यापही 131 इमारती धोकायदायक अवस्थेत असून त्या कधीही कोसळू शकतात. न्यायप्रविष्ट बाबींमुळे राहिलेल्या इमारतींचे घरमालक तसेच भाडेकरुंना नगरपालिकेने नोटीस दिली आहे.

सातारा शहरातील मंगळवार पेठ, व्यंकटपुरा पेठ, चिमणपुरा पेठ, रामाचा गोट, शुक्रवार पेठ, गडकर आळी, कोल्हटकर आळी, माची पेठ हा परिसर जुना सातारा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर बर्‍याच पेठा नव्याने वसल्या. नव्या आणि जुन्या पेठांमध्ये बर्‍याच इमारती हेरिटेजमध्ये आहेत. त्याचबरोबरच पेठांमधील इतर इमारती शेकडो वर्षांच्या झाल्या आहेत. सातार्‍यात धोकायदायक इमारती मोठ्या प्रमाणावर आहेत. या इमारती पडून मोठी जीवित व वित्‍तहानी होण्याची शक्यता आहे. हा धोका ओळखून सातारा नगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून धोकादायक इमारती पाडण्यात येत आहेत.

 मात्र, ही कारवाई अपवादात्मक परिस्थितीतच होत असल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांपूर्वी डॉल्बीच्या दणदणाटानंतर दगडी पोस्टजवळील धोकादायक इमारत कोळून एकजणाला जीव गमवावा लागला. त्यापूर्वी माची पेठेत जुनी जीर्ण इमारत कोसळून वृध्दा जखमी झाली होती. या दोन्ही इमारती नगरपालिकेच्या धोकायदायक इमारतींच्या यादीत होत्या. पण त्यावर कारवाई न झाल्याने दोन्ही घटना घडल्या. अशा घटनांची वाढू लागल्यानंतर सातारा नगरपालिकेने धोकायदायक इमारतींचा सर्वे केला. त्यानंतर काही इमारतींवर कारवाईही सुरु झाली. मात्र, संबंधित इमारतीचा मालक आणि भाडेकरु यांच्यात असलेल्या न्यायालयीन वादाच्या प्रकरणांमुळे धोकायदायक इमारतींवर फार मोठी कारवाई होवू शकली नाही. मात्र या दोघांच्या भांडणात आजुबाजूच्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे धोकायदायक इमारती पाडाव्यात, अशी मागणी संबंधित पेठांतील नागरिक करु लागले आहेत.

सोमवार पेठेत 14 धोकायदायक इमारती होत्या. त्यापैकी 7 इमारती नगर पालिकेच्या बांधकाम विभागाकडून जमीनदोस्त करण्यात आल्या. मंगळवार पेठेत 5 इमारती अखेरच्या घटका मोजत असूनही त्याठिकाणी अद्याप कारवाई झालेली नाही. बुधवार पेठेत जुजबी कारवाई झाली. त्याठिकाणी 8 पैकी एकच धोकायदायक इमारत पाडण्यात आली. गुरुवार पेठेत धोकायदायक इमारतींची संख्या मोठी आहे. याठिकाणी 21 पैकी एकही धोकादायक इमारत पाडली गेली नाही. शुक्रवार पेठ, चिमणपुरा पेठ, गोडोली आणि दुर्गा पेठेत प्रत्येकी एक धोकायदायक इमारत आहे. त्यावरील कारवाई ढिम्म आहे. करंजे पेठेतील तीन पैकी 2 धोकायदायक इमारती पाडल्याने याहीठिकाणी एक धोकायदायक इमारत उरली आहे. रविवार पेठेतील दोन धोकायदायक इमारती पाडल्या असल्या तरी अद्यापही 2 जीर्ण इमारती उभ्या आहेत. 

सदरबझारमध्ये 4 धोकायदायक इमारती असून त्या पाडाव्यात अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होत आहे. व्यापारी पेठेतही मोठ्या प्रमाणावर जीर्ण इमारती आहेत. भवानी पेठेत 15 धोकायदायक इमारती असून सदाशिव पेठेत एक इमारत पाडली असली तरी 7 धोकायदायक इमारती अद्याप उभ्या आहेत. यादोगोपाळ पेठेतील 4 इमारतींवर कारवाई झाली असली तरी 6 इमारती कोसळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पंताच्या गोटातील एका इमारतीवर कारवाई झाली असून 4 इमारती धोकायदायक आहेत. रामाचा गोट येथे 2, मल्हार व माची पेठेत प्रत्येकी 3 तर व्यंकटपुरा पेठेत 4 इमारती धोकादायक आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिक जीव मुठित घेवून वावरत आहेत. प्रतापगंज पेठेत 2 धोकायदायक इमारती पाडल्या असल्या तरी 3 इमारती अखेरच्या घटका मोजत आहेत.

याशिवाय अनेक इमारती धोकादायक झाल्या असतानाही त्या इमारतींचा वापर रहिवासासाठी होत आहे. या इमारतींचा सर्वेत समावेश नाही. काही ठिकाणी इमारतींना ठेपे दिल्याचेही पहायला मिळत आहे. काही इमारतींच्याबाहेर नगरपालिकेने इशारावजा सुचनाही लावल्या आहेत. मात्र, तरीही संबंधित इमारतींचा रहिवासासाठी वापर केला जात आहे. इमारती कोसळल्यावर जीवित हानी होणार हे माहिती असूनही लोक त्यामध्ये रहात आहेत. त्यामुळे ‘बुडती हे जन, देखवे न डोळा,’ अशी परिस्थिती आहे. संबंधितांना नगरपालिकेने नोटीस दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे, इमारत पाहणी केली असता ती धोकायदायक असल्याचे पूर्वी कळवले आहे. इमारत उतरवून न घेतल्यास ती पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिवीत व वित्‍त हानी होण्याची शक्यता आहे. संबंधित इमारत उतरवून न घेतल्याने जिवीत व वित्‍त हानी झाल्यास आपण जबाबदार रहाल, अशा नोटीसा संबंधित घरमालक तसेच भाडेकरुंना सातारा पालिकेने दिल्या आहेत.

सातारा नगरपालिकेचे आजी-माजी पदाधिकार्‍यांची संख्या मोठी असलेली शनिवार पेठ आहे. शहरात ज्या जुन्या पेठा आहेत, त्यापैकी शनिवार पेठ असून या पेठेत सर्वाधिक 32 धोकादायक इमारती आहेत. जीर्ण झालेल्या इमारतींमुळे लगतच्या मिळकतींना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा धोकायदायक इमारतींवर नगरपालिकेने कारवाई करावी, अशी मागणी या पेठेतील नागरिक करु लागले आहेत.