Your Own Digital Platform

बलात्कार करून ५१ लाखांची लूट; ब्लॅकमेलरला अटक


खंडाळा : येथील एका महिलेला सोशल मीडियावर झालेली मैत्री चांगलीच महागात पडली. अहमदनगर येथील सुनील गंगाधर डहाळे याने 2014 मध्ये पीडित विवाहित महिलेच्या घरात घुसून बलात्कार केला होता. याची माहिती पती व नातेवाईकांना देण्याची धमकी देत त्या महिलेकडून सोन्याचे दागिने व रोख रकमेचा भरणा करण्यास भाग पाडून तब्बल 51 लाख रुपयांची फसवणूक केली. दरम्यान, सातारा पोलिसांनी त्याला रविवारी अटक केली.

पीडित विवाहित महिला व सुनील डहाळे याची 2014 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. यातूनच पीडित महिलेने आपला व्हॉटस्अ‍ॅप नंबर सुनीलला दिला होता. व्हॉटस्अ‍ॅपवरूनही या दोघांमध्ये चर्चा होत होती. या मैत्रीचा फायदा घेऊन सुनील पीडित महिलेच्या आणखी जवळ गेला. यातूनच सप्टेंबर 2014 मध्ये त्याने त्या महिलेच्या घरात घुसून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला.

 त्याचा व्हिडिओ काढून व महिलेचे आक्षेपार्ह फोटो काढून याद्वारे तिची बदनामी करण्याची धमकी दिली. हे व्हिडिओ व फोटो पती व नातेवाईकांना दाखवेन, असे तो सांगत होता. सोशल मीडियावरही व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली होती. त्यामुळे पीडित महिलेने बदनामी होऊ नये म्हणून सुनीलला वेळोवेळी सोन्याचे दागिने दिले. आजअखेरपर्यंत तिने त्याला 3 किलो 768 ग्रॅम सोन्याचे दागिने दिले. वेळोवेळी सुनीलच्या बँक खात्यात रोख रकमेचा भरणाही केला. अशी एकूण 51 लाख 18 हजार रूपयांची फसवणूक सुनील डहाळे याने केली होती.

याबाबत पीडित महिलेने खंडाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल दिली. सोशल मीडियाच्या आधारे सुनील डहाळे याचा पत्ता काढला. तो अहमदनगरचा असल्याने खंडाळा पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने रविवारी त्याच्या मुसक्या आवळल्या.