Your Own Digital Platform

येणपे प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी


कराड: येणपे, ता. कराड येथील विवाहितेवर अत्याचार व हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ येथील दत्त चौकातून प्रीतिसंगम बागेपर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी पीडितेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही या कुटुंबीयांच्या ठामपणे पाठीशी राहू, असा दिलासा कराड तालुक्यातील समस्त मराठा समाजासह विविध समाजिक संघटनांच्यावतीने ग्रामस्थांना देण्यात आला.

येणपे येथील घटनेबाबत समाजाच्या सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यापार्श्वभूमीवर कराड शहरासह परिसरातील सकल मराठा क्रांती मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांसह समाजातील विविध संघटना, संस्थांच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी रविवारी येथील दत्त चौकात पीडितेला श्रद्धांजली अर्पण करून या घटनेच्या निषेधार्थ कराड शहरातून कॅन्डल मार्च मुक रॅली काढली.

 मूक निषेध रॅलीत हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी असणारे फलक महिलांनी हातात घेतले होते. यावेळी येणपे ग्रामस्थांसह पीडितेचे कुटुंबिय, समाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

निषेध रॅलीची सुरूवात येथील दत्त चौकात छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून काही काळ स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर रॅली प्रीतिसंगम घाटावर गेली. स्व. चव्हाण समाधीस्थळी महिलांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन करून या रॅलीची सांगता झाली.