Your Own Digital Platform

सर्किट हाऊसवर रामराजे-उदयनराजे पुन्हा एकदा एकत्र; पण, योगायोगाने...सातारा: महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे काल रविवार (दि. 9) रोजी दुपारी एक वाजता येथील शासकीय विश्रामगृहात खाजगी कामासाठी आले होते. दरम्यान, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हेही दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. दोहोंत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर त्याठिकाणी उपस्थित असलेल्यांच्या अंगावर शहारे आले खरे. मात्र आज झालेला प्रकार हा निव्वळ योगायोग असल्याचे काही काळानंतर निष्पन्न झाले.

महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे काही कामानिमित्त विश्रामगृहावर आले होते. ना. श्रीमंत रामराजे हे विश्रामगृहावरील क्रमांक एकच्या कक्षात विश्रांती घेत होते. तर शेजारीच असणार्‍या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यामुळे बहुतांश पत्रकार यासाठी विश्रामगृहावर दाखल झाले होते. त्याचदरम्यान सुमारे अर्धा ते एक तासाच्या फरकाने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हेही दाखल झाले. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे आले व क्रमांक दोनच्या कक्षात ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेवू लागले. ते आले आहेत हे समजल्यानंतर ना. श्रीमंत रामराजे यांच्या दालनाचे दार बंद करण्यात आले.

दोन्ही काँग्रेसची पत्रकार परिषद सुरु असताना हे दोन्ही राजे विश्रामगृहातून बाहेर गेलेले होते. पण, या दोन्ही राजेंच्या योगायोगाने झालेल्या या प्रकारामुळे उपस्थितांच्या अंगावर मात्र शहारे आले.