निवृत्त शिक्षकाला १५ लाखाला गंडा


कराड : तुमच्या नावावर बेहिशेबी काळा पैसा असून तुम्हाला कोर्टातून क्लीन चीट मिळण्यासाठी व तुमच्या खात्यावरील सर्व रक्कम तुम्हाला परत मिळवून देतो, असे सांगून सेवानिवृत्त शिक्षकाला सुमारे पंधरा लाखांना गंडा घातला. याप्रकरणी नोएडा येथील टाटा लाईफ इन्शुरन्स कंपनी अधिकार्‍यासह सात जणांवर कराड तालुका पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी संभाजी ज्ञानदेव दाभोळे (वय 62, रा. बालाजी कॉलनी, आगाशिवनगर, मूळ रा. साळशिरंबे, ता. कराड) यांनी तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून जगमोहन सक्सेना, अमन मल्होत्रा, अनुराग बासू, सत्यजित पाठक, राजसिंह मल्होत्रा, रामकुमार यादव, दीनदयाळ रेड्डी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, संभाजी दाभोळे हे सेवानिवृत्त शिक्षक असून आगाशिवनगर येथे राहण्यास आहेत. त्यांचे बँक ऑफ महाराष्ट्र व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक उंडाळे तसेच आगाशिवनगर येथे सेव्हिंग खाते आहे. त्यांना जानेवारी 2016 पासून सोनिया शर्मा यांचा टाटा लाइफ इन्शुरन्स कंपनी ग्रेटर नोएडा येथील कंपनीत तुमच्या नावावर दोन लाख रुपये आहेत, असा वारंवार फोन येत होता. त्यानंतर जगमोहन सक्सेना यांच्याकरवी संपर्क साधून तुमच्या नावावर कंपनीने दोन लाख रुपये असल्याचे सांगितले. त्यासाठी तीस हजार रुपयांची विमा पॉलिसी काढावी लागेल, असेही सांगण्यात आले.

त्यामुळे दाभोळे यांनी एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनीची 15 हजार 500 रुपयांची पॉलिसी घेतली. पॉलिसीची कागदपत्रे मिळताच 25 हजार 500 रुपयांची दुसरी पॉलिसी घेतली. असे करत दाभोळे यांच्या नावावर आठ तर त्यांच्या पत्नीच्या नावावर दोन, मुलीच्या नावावर दोन तर जावयांच्या नावावर पाच पॉलिसी करण्यात आल्या. तर सर्व पोलिसी जगमोहन सक्सेना, अमन मल्होत्रा, अनुराग बासू या एजंट लोकांकडे करण्यात आल्या. त्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये निलेश भाई गांधी गुवाहाटी यांनी फोन करून दाभोळे यांना लवकरच बोनस व पॉलिसीची रक्कम मिळेल असे सांगितले. मनीष शर्मा सिमला यांनीही तुमच्या खात्यावर रक्कम जमा होईल, असे सांगितले. त्यानंतर संभाजी दाभोळे यांनी टाटा डीआईजी कंपनीतून आलेल्या फोन नंबर वर संपर्क साधला असता सत्यजित पाठक यांनी बोनस फंडाविषयी चौकशी केली तसेच आपण वित्त मंत्रालयात असल्याचे सांगितले. 

त्यानंतर त्याने दाभोळे यांच्या नावावर कंपनीत 24 लाख 73 हजार तीनशे नव्वद रुपये 75 पैसे एवढी रक्कम असल्याचे सांगितले. हा सर्व रक्कम मिळण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स घेतली. त्यानंतर जीएसटी भरावी लागेल असे सांगितले. म्हणून दाभोळे यांनी वेगवेगळ्या तारखेला दोन लाख 86 हजार 320 रुपये भरले. हे पैसे भरल्यानंतर संबंधितांनी दाभोळे यांना 31 लाख 5 हजार 335 रुपये किमतीच्या डीडीची झेरॉक्स व्हाट्सअप वर पाठवली. त्यानंतर संबंधितांनी दाभोळे यांच्याकडून दहा टक्के स्टॅम्प ड्युटी म्हणून 2 लाख 2 हजार रुपये भरून घेतले. तसेच ऍडव्हान्स इन्कम टॅक्स भरण्यासाठी 93 हजार 988 रुपये भरले. एवढी रक्कम भरल्यानंतर दाभोळे यांच्या खात्यात 35 लाख 36 हजार तीनशे रुपये जमा आहेत, असे सांगितले. अशाप्रकारे वेगवेगळी कारणे सांगून दाभोळे यांच्याकडून 14 लाख 24 हजार 274 रुपये उकळले. संशयितांनी आयकर विभाग, कोर्ट व पोलिसांची भीती घालून संभाजी दाभोळे यांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दाभोळे यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी करत आहेत.

No comments

Powered by Blogger.