आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

येणपे बलात्कार प्रकरण : अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न- नांगरे-पाटील


कराड : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी रविवारी येणपे (ता. कराड) येथील मृत विवाहितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या गुन्ह्याच्या तपासात कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची पोलीस काळजी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हा खटला जलदगती न्यायालयात चालावा आणि सरकार पक्षातर्फे काम पाहण्यासाठी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, यासाठी प्रयत्न करणार आहोत. भक्कम पुरावे न्यायालयासमोर आणून संशयितांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकार पक्ष करेल. निर्भया आणि मनोधैर्य योजनेतून पीडितेच्या कुटुंबाला अर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल. या गुन्ह्याचा तपास योग्य पध्दतीने सुरू असून ग्रामस्थांनी शांतता पाळण्याचे आवाहन नांगरे-पाटील यांनी केले.

दरम्यान, रेठरे-वारणा येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेतली. संशयितांना फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच भारतीय मराठा संघाने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. संशयीतांचे वकिलपत्र घेऊ नये, असे आवाहन केले आहे.