अन् त्या बिबट्याचे प्राण वाचले!


कराड : कराड तालुक्यातील चोरजवाडी नजीक असलेल्या डोंगर पायथ्याला तडफडत पडलेल्या बिबट्याची जगण्यासाठी धडपड सुरू होती. याबाबतची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्राणीमित्रांनी पळापळ करून त्याच्यावर उपचार केले व त्याला सुरक्षित स्थळी हलवले.

 शनिवार दिनांक २९ रोजी रात्री सात वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत बिबट्याला वाचविण्यासाठी वन विभागासह प्राणिमित्रांची सुमारे १० तासांची धावपळ यशस्वी झाली आणि बिबट्याचे प्राण वायाबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री ७ वाजता उंब्रजापासून जवळ असलेल्या जयवंत शुगर कारखान्याजवळ चोरजवाडी गावच्या नजीक डोंगर पायथ्याला एक बिबट्या ओढ्याच्या काठावर तडफडत पडला होता.

याची माहिती एका गुराख्याने कराडचे वनक्षेत्रपाल डॉ. अजीत साजणे यानां दिली. माहिती मिळताच वनक्षेत्रपाल यांनी बीट गार्डला तात्काळ घटनास्थळी जाण्यास सांगितले. गार्ड घटनास्थळी पोहचल्यावर त्याने जागेची पाहणी केली असता डोंगर पायथ्याला एका ओढ्यालगत एक बिबट्या तडफडताना त्यांना दिसला. तो जमिनीवर पडलेला अवस्थेत अधूनमधून डरकळी फोडत होता.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गार्डने पुन्हा अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. तोपर्यंत रात्रीच्या साधारणपणे सव्वा नऊ वाजले होते. त्यातच अधून-मधून पाऊस पडत असल्याने घटनास्थळी पोहोचण्यास अडचण निर्माण होत होती. तडफडत पडलेल्या बिबट्याच्या जीवाचा प्रश्न असल्याने वनक्षेत्रपाल यांनी पळापळ करून पशू वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उपलब्ध होतात का? याची माहिती घेत स्वतः घटनास्थळाकडे धाव घेतली.

त्याचवेळी त्यांनी प्राणी मित्र रोहन भाटे यांच्याशी संपर्क साधून त्यांना मदतीसाठी येण्याचे आवाहन केले. वनक्षेत्रपाल यांचा फोन येतात भाटे यांनी क्षणाचाही विलंब न लावता बिबट्याचा जीव वाचवण्यासाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. वनक्षेत्रपाल यांच्यासह प्राणीमित्र साधारणता रात्री साडेअकरा वाजता घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत तेथे वनविभागाचे इतर कर्मचारी दाखल झाले होते.

 सातारा येथील मोबाईल स्कॉडचे वनक्षेत्रपाल संदीप गवारे यांना ही घटनास्थळी बोलावून घेतले होते. उपलब्ध सुविधेच्या आधारे घटनास्थळावरच तडफडणाऱ्या बिबट्यावर प्राथमिक उपचार करून वनविभागाचे अधिकारी व प्राणीमित्रांनी बिबट्याला पुढील उपचारासाठी सुरक्षित स्थळी हलवले. बिबट्याच्या अंगात पुरेसा त्राण राहिला नसल्याने त्याला पकडणे सहज शक्य झाले. उपचारास बिबट्याने चांगला प्रतिसाद दिला. त्याला खाण्यासाठी ताजे चिकन देण्यात आले. त्यालाही बिबट्याने प्रतिसाद देऊन बिबट्याची हालचाल वाढली.

साधारणपणे रात्री सात वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत बिबट्याला वाचवण्यासाठी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व प्राणिमित्रांची धडपड सुरू होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर रविवारी सकाळी दिसत होते. बिबट्याला वाचविण्यासाठी सुमारे दहा तास राबविलेल्या मोहिमेत सातारा येथील पशुवैद्यकीय अधिकारी, कराड वनक्षेत्रपाल अजित साजने, प्राणीमित्र रोहन भाटे यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.चले.

No comments

Powered by Blogger.