नूतन तहसीलदार वाळू सम्राटांवर अंकुश ठेवणार का?


गोंदवले : माण हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात असला तरी बेसुमार अवैध वाळू उपसा होत आहे. महसूल खात्याने अनेकदा कारवाई करूनही मुजोर वाळू सम्राट त्यास दाद देईना झाले आहेत. नुकताच माण तालुक्‍याचा पद्‌भार स्वीकारलेल्या तहसीलदार बी. एस. माने यांच्यासमोर वाळू तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान आहे. माणगंगेची चाळण बनवणाऱ्या वाळू माफियांवर नुतन तहसीलदार अंकुश ठेवणार की सावळा गोंधळ तसाच सुरू राहणार याची चर्चा माण तालुक्‍यात सुरू आहे.

माणच्या तहसीलदारपदाचा पद्‌भार नुकताच बी. एस. माने यांनी घेतला आहे. प्रशासकीय कामकाजाबरोबरच सध्या वाळू तस्करीचे मोठे आव्हान महसूल विभागासमोर असते. माण तालुक्‍यातील माणगंगेच्या वाळुला काळे सोने म्हणून ओळखले जाते. ही वाळू अतिशय चांगल्या प्रतीची आहे. यामुळे यावर परजिल्ह्यातील वाळु तस्करांचा डोळा आहे. गेल्या दोन-तीन वर्षात सांगली, सोलापूर व कोल्हापूर, पुणे येथील वाळु माफियांनी येथे चांगलाच धुमाकूळ घातला आहे. येथे महसुल व पोलीस यंत्रणा हाताशी धरून दररोज माणच्या पुर्व भागातुन शेकडो ट्रक वाळू परजिल्ह्यात नेली जात आहे. या परजिल्ह्यातील वाळु तस्करांनी प्रशासनातील कर्मचाऱ्यांवर वेळोवेळी जीवघेणे हल्लेही केले आहेत. तसे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. 

यामध्ये महसुलचे काही कर्मचारी वाळु तस्करांना पाठिंबा देत असतात. हेच महसुलचे खालचे कर्मचारी वाळु तस्करांना मदत करतात. या झारीतील शुक्राचार्यांवरही कारवाईचा बडगा उगारावा लागणार आहे. नाहीतर येरे माझ्या मागल्या प्रमाणे माण तालुक्‍याची परस्थिती होऊ शकते. माने यांनी यापुर्वी माळशिरसला तहसीलदार म्हणून काम केले आहे. माळशिरस आणि माण हे दोन तालुके जवळ जवळच असल्याने त्यांना माण तालुक्‍याविषयी काय जास्त माहिती करून घेण्याची गरज भासणार नाही. दुसरीकडे त्यांना प्रशासनावर वचकही ठेवावा लागणार आहे. आधीच मोठा सावळा -गोंधळ महसूलमध्ये सुरू आहे. येथे पुरवठा विभाग, सेतु विभाग व अन्य विभाग नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिले आहेत. त्यामुळे त्यांना सबंधित विभागाला वठणीवर आणतांना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे बी. एस. माने वाळु तस्करी रोखत? प्रशासनावर वचक ठेवणार का? हे ही लवकरच समजेल.

No comments

Powered by Blogger.