जिल्ह्यात डॉल्बी बंदचे आदेश


सातारा : जिल्ह्यातील डॉल्बीमालक तसेच गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी डॉल्बी सिस्टीम दि. 13 ते दि. 23 रोजीपर्यंत वापरण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. डॉल्बी मशिन तसेच त्यासंबंधीची इतर यंत्रसामग्री सीलबंद स्थितीत ठेवावी, असे स्पष्ट आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी सचिन बारवकर यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात सर्वत्र गणरायाच्या आगमनाची धूम आहे. गणेशोत्सवात डॉल्बीचा दणदणाट केला जातो. मात्र, दोन वर्षांपासून जिल्ह्यात डॉल्बीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र, यावर्षी डॉल्बी वाजणारच, असा निर्धार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे तरुणाईत उत्साहाचे वातावरण होते. मात्र, डॉल्बीला बंदी घालावी, अशी मागणी पोलिस प्रशासनाने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांना गणेशोत्सव काळात डॉल्बी बंद करण्यासाठी प्रस्ताव नुकताच सादर केला. जिल्ह्यात दि. 13 रोजीपासून दि. 23 रोजीपर्यंत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर गणेश मंडळांकडून डॉल्बीचा वापर केला जाणार असून, त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न नाकारता येत नाही. त्यामुळे डॉल्बीमालकांकडे असलेल्या डॉल्बी सिस्टीमला रोखून धरणे आवश्यक आहे. डॉल्बी सिस्टीम आहे त्या ठिकाणी सीलबंद करणे किंवा संबंधित डॉल्बीमालकांवर कारवाई करावी. 

दि. 13 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून दि. 23 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत डॉल्बी वापरात आणू नये. डॉल्बी आहे त्याठिकाणी सीलबंद ठेवण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी पोलिसांनी जिल्हादंडाधिकार्‍यांकडे केली होती. त्यावर अप्पर जिल्हादंडाधिकार्‍यांनी गणेशोत्सव काळात जिल्ह्यात डॉल्बी बंदीचे आदेश दिले आहेत.

No comments

Powered by Blogger.