सातारच्या ऐतिहासिक बोगद्याला घरघर


सातारा : जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूची दूरवस्था होत चालली आहे. अशातच 163 वर्षांपूर्वी दगडी बांधकाम केलेल्या सातारच्या ऐतिहासिक बोगद्याचीही तीच अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व पालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षतेमुळे या बोगद्यात दुर्गंधी पसरली आहे. वाढलेल्या झुडपांमुळे तेथील दगडीही निसटू लागली आहेत. त्यामुळे प्रवासी, नागरिक व वाहनचालकांत आता भितीचे वातावरण असून या बोगद्याची पाहणी करुन त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी सातारकर करु लागले आहेत.

सातारच्या पश्‍चिमेकडील परळी व जकातवाडीकडे जाण्यासाठी या ऐतिहासिक बोगद्याचा वापर केला जातो. ऐतिहासिक दगडी बोगदा सातारचाच नव्हे तर जिल्ह्याचा मानबिंदू समजला जातो. या दगडी बोगद्यामुळे सातारा शहराशी पश्‍चिम, दक्षिणकडील अनेक गावे जोडली गेली आहेत. इंग्रजांच्या काळात कॅप्टन पी. एल. हार्टच्या मार्गदर्शनाखाली 1855 मध्ये हा बोगदा खोदला आहे. संपूर्ण दगडी असलेला हा बोगदा म्हणजे बांधकाम क्षेत्रातील एक उत्तम उदाहरण समजले जाते. असा ऐतिहासिक दगडी बोगदा क्वचित भारतात पहायला मिळेल.

अलिकडे या ऐतिहासिक वास्तूची अवस्था दयनीय झाली आहे. या परिसरात दारुच्या पार्ट्या करत काहीजण बोगद्यामध्येच बाटल्या फेकत आहेत. बोगद्याच्या दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नाल्यात तर सर्वत्र कचराच पसरला आहे. काही महाभाग लघूशंकेसाठीही बोगद्याचा वापर करु लागले आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक बोगद्यात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तेथून जाणेही नागरिकांसाठी मुश्किल झाले आहे. त्यातच बोगद्याच्या वरील डोंगरातून पाणी झिरपत आहे. त्यामुळे बोगद्याला गळती लागली आहे. बोगद्यातील रस्त्याची मोठी दूरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्ता खड्यात गेला आहे. बोगद्यात प्रवेश करणार्‍या वरच्या बाजूला झाडंझुडपही वाढलेली आहेत. त्यामुळे तेथून अनेकवेळेला खाली छोट्या-मोठ्या दगडी पडत असतात. काही दिवसांपूर्वी सातारा शहराच्या बाजूस असलेल्या प्रवेशद्वाराकडील बाजूच्या दगडी कोसळल्या आहेत. त्या बांधकाम विभागाकडून त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. दरड कोसळून एखादी मोठी दुर्घटना घडण्याच्या अगोदर या ऐतिहासिक बोगद्याची पाहणी करुन दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

No comments

Powered by Blogger.